IAF Fighter Jet Crashes: भारतीय हवाई दलाच्या जग्वार या लढाऊ विमानाचा हरियाणातील पंचकुला येथे अपघात झाला आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, अंबाला येथील हवाई अड्ड्यावरून प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर विमानात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सदर लढाऊ विमानाचा अपघात झाला. सुदैवाने वैमानिक यात वाचला आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर वैमानिकाने विमान लोकसंख्या नसलेल्या निर्जन स्थळी विमान नेले.

या घटनेनंतर पंचकुला येथील गावात भीतीचे वातावरण आहे. अपघात होण्याआधी वैमानिकाने पॅराशूटच्या आधारे सुरक्षित बाहेर पडण्यात यश मिळवले.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने सांगितले की, सायंकाळी नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर सदर अपघात घडला. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले. वैमानिकाने तातडीने निर्णय घेत परिस्थिती हाताळली आणि विमान सुरक्षित स्थळी नेऊन त्यातून बाहेर पडण्यात यश मिळविले. विमान कोसळल्यानंतर लष्कराचे बचाव पथक आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने चौकशी समिती नेमली आहे. अपघाताचे नेमके कारण यातून शोधले जाईल.

हवाई दलाने अपघाताची माहिती देण्यासाठी एक्स वर पोस्टही केली आहे. ज्यामध्ये म्हटले की, हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान तांत्रिक कारणामुळे कोसळले. वैमानिकाने चातुर्य दाखवत सदर विमान लोकसंख्या नसलेल्या निर्जन स्थळी नेले. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.