Prayagraj Crime : देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये हिंसा, गोळीबार, जाळपोळ, हाणामारी, खून, दरोडा, लैंगिक अत्याचार अशा अनेक वेगवेगळ्या घटना घडत असल्याची माहिती दररोज समोर येत आहे. आता उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

प्रयागराज येथील छावणी परिसरातील एका भारतीय हवाई दलाच्या (IAF) सिव्हिल इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव एसएन मिश्रा असं असल्याचं सांगण्यात येत आहे. एसएन मिश्रा यांच्यावर शनिवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान हल्ला करण्यात आला. एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या बंगल्याच्या बाहेरून आधी हाक मारली. त्यानंतर मिश्रा यांनी बंगल्याची खिडकी उघडली. मात्र, खिडकी उघडताच हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते हल्लेखोर हा जीवे मारण्याच्या उद्देशाने आला असावा. या घटनेची पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच ही घटना घडली, त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. दरम्यान, मिश्रा यांच्या पत्नी आणि मुलाने पोलिसांत या संदर्भातील तक्रार दाखल केली आहे.

तसेच घटना नेमकं कशी घडली? हल्लेखोरांनी गोळीबार कसा केला? हल्लेखोरांनी गोळीबार करण्याच्या आधी आवाज दिला होता, नेमकं घटनाक्रम कसा होता? याची माहिती मिश्रा यांच्या पत्नीने पोलिसांनी माहिती दिली आहे. तसेच ही घटना घडल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत. तसेच या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.