एपी, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अचानक हवाई दलाच्या जनरल सी क्यू ब्राऊन ज्युनियर यांची ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. जनरल ब्राऊन हे इतिहास घडवणारे लढाऊ विमानांचे वैमानिक आणि सर्वांचा आदर कमावणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. अमेरिकेच्या लष्करामध्ये बहुविविधतेचे समर्थन करणाऱ्या आणि पदांमध्ये समानतेचा आग्रह धऱणाऱ्या अधिकाऱ्यांना दूर करण्याच्या विद्यामान संरक्षणमंत्र्यांच्या मोहिमेचा भाग म्हणून ब्राऊन यांना शुक्रवारी काढून टाकण्यात आले.

जनरल ब्राऊन यांच्यासह नौदल ऑपरेशन्स प्रमुख अॅडमिरल लिसा फ्रँचेट्टी आणि हवाई दलाचे उपप्रमुख जनरल जिम स्लाइफ यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. हवाई दलाचे निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल डॅन राझिन केन यांना पुढील अध्यक्ष म्हणून नेमणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. लेफ्टनंट जनरल केन हे एफ-१६ वैमानिक असून त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

अमेरिकेच्या ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’मध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा समावेश असते. हा गट अमेरिकेचे अध्यक्ष, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा प्रमुख लष्करी सल्लागार असतो. जनरल ब्राऊन हे ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’च्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणारे केवळ दुसरे कृष्णवर्णीय लष्करी अधिकारी आहेत. ते या पदावर गेले १६ महिने होते. त्यांच्या कारकिर्दीचा हा काळ युक्रेनमधील युद्ध आणि पश्चिम आशियातील वाढणारा संघर्ष यांनी व्यापला होता.

जनरल ब्राऊन यांची हकालपट्टी ही पेंटागॉनसाठी धक्कादायक बातमी आहे. पेंटागॉन पुढील आठवड्यापासून ५,४०० नागरी परिविक्षाधीन कामगारांना काढून टाकत आहे. तसेच पुढील वर्षात आणखी कपात करून ५० अब्ज डॉलरची बचत केली जाईल.

कृष्णवर्णीयांच्या अधिकारांना पाठिंबा

मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस येथे जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीची श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने हत्या केल्यानंतर अमेरिकेत सुरू झालेल्या ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर या मोहिमेला जनरल ब्राऊन यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते लष्करामध्ये जागृतिवाद आणत आहेत अशी टीका प्रशासनाकडून केली जात होती.

Story img Loader