Air Hostess raped at Medanta Hospital: गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात व्हेटिंलेटरवर उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. सदर एअर होस्टेसने तक्रार दाखल केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. शुक्रवारी (दि. १८ एप्रिल) गुरुग्राम पोलिसांनी रुग्णालयातील तंत्रज्ञ दीपक कुमारला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली.

प्रकरण काय आहे?

मुळची पश्चिम बंगालमध्ये राहणारी एअर होस्टेस (वय ४६) तिच्या विमान कंपनीच्या एका प्रशिक्षणासाठी गुरुग्राममध्ये आली होती. ज्या हॉटेलमध्ये महिला थांबली होती, तेथील स्विमिंग पूलमध्ये पडून जखमी झाल्यामुळे तिला ५ एप्रिल रोजी मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल रोजी तिचे लैंगिक शोषण झाले, असा आरोप तिने केला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर १४ एप्रिल रोजी पीडितेने डिजिटल बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली.

गुरुग्राम पोलीस आयुक्त विकास कुमार अरोरा यांनी गुरूवारी एसआयटी नेमून आरोपीला पकडण्यासाठी विविध पथके पाठवली. त्यानंतर दीपक कुमारला अटक करण्यात आली.

दीपक कुमार (वय २५) हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. मेदांता रुग्णालयात तो तंत्रज्ञ म्हणून काम करत असून आयसीयूमधील यंत्राची देखभाल करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पाच महिन्यांपूर्वी तो या रुग्णालयात रुजू झाला होता. शनिवारी त्याला न्यायालयात सादर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पीडितेने केला डिजिटल बलात्काराचा आरोप

एअर होस्टेसने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील दोन नर्स तिचे कपडे बदलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी पीडित महिला अर्धबेशुद्ध अवस्थेत होती. यावेळी तिथे एक पुरूष येऊन दोन नर्सशी बोलत असल्याचे तिला जाणवले. त्या व्यक्तीने दोन्ही नर्सना उद्देशून माझ्या कमरेच्या घेरावर प्रतिक्रिया दिली. तसेच काही वेळाने त्याचा हात माझ्या शरीराच्या खालून गेल्याचे मला जाणवले. आरोपीने गुप्तांगाला स्पर्श केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.

डिजिटल बलात्कार म्हणजे काय?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, डिजिटल बलात्कार ही संज्ञा गंभीर प्रकारच्या विनयभंगासाठी वापरली गेली आहे. महिलेच्या संमतीशिवाय बळजबरीने गुप्तांगाला हात लावण्याच्या प्रकारासाठी डिजिटल बलात्कार असा शब्द वापरला गेला.
अशा प्रकारचा गुन्हा घर, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे किंवा कोठडीत होऊ शकतो. या प्रकाराच्या गुन्ह्यामुळे पीडितेला मानसिक धक्का बसतो.