हवाई वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या एअर इंडिया कंपनीवर भाजपा नेत्याने ताशेरे ओढले आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी एअर इंडियातील सेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा अलीकडील अनुभव त्यांनी एक्सद्वारे पोस्ट केला असून सर्वांत वाईट एअरलाईनसाठी एअर इंडियाला ऑस्कर पुरस्कार द्यावा, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील एक्सवर म्हणाले, एअर इंडियाने प्रवास करतानाचा अनुभव चांगला नव्हता. या एअरलाईनने सर्व विक्रम मोडित काढले आहे. जर सर्वात वाईट एअरलाइनसाठी ऑस्कर समतुल्य पुरस्कार मिळाला असता, तर एअर इंडिया प्रत्येक श्रेणीत जिंकली असती. तुटलेल्या जागा, सर्वात वाईट कर्मचारी, वाईट ग्राऊंड सपोर्ट स्टाफ.

शेरगिल यांनी एक्सवर आपली दुर्दशा सांगितल्यानंतर, एअर इंडियाने गैरसोयीबद्दल माफी मागितली.

शिवराज सिंह यांनीही व्यक्त केला होता संताप

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही एअर इंडियावर ताशेरे ओढले होते. भोपाळ ते नवी दिल्ली या त्यांच्या अलिकडच्या विमान प्रवासात (एआय४३६) त्यांना नादुरुस्त सीट दिल्याबद्दल एअर इंडियावर टीका केली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी शेरगिल यांनी टीका केली. चौहान म्हणाले की, पूर्ण भाडे आकारले जात असतानाही असा अप्रिय अनुभव प्रवाशांची फसवणूक करण्यासारखा आहे.

“मला 8C क्रमांकाची सीट देण्यात आली होती. जेव्हा मी माझ्या सीटवर पोहोचलो आणि बसलो तेव्हा मला आढळले की ती तुटलेली आहे. त्यावर बसणं शक्य नव्हतं”, चौहान यांनी X वरील एका लांब पोस्टमध्ये म्हटले आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की जेव्हा त्यांनी एअरलाइन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की व्यवस्थापनाला सीटच्या स्थितीची माहिती देण्यात आली आहे.

“जेव्हा मी विमान कर्मचाऱ्यांना विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की व्यवस्थापनाला सीटच्या स्थितीबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती. तसंच, या सीटचे तिकिट विकले जाऊ नये असे आदेशही देण्यात आले होते”, असे ते पुढे म्हणाले. चौहान यांची पोस्ट व्हायरल होताच, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मंत्र्यांशी बोलून कारवाईचे आश्वासन दिले. विमान वाहतूक नियामक, डीजीसीए, यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.

टाटा समूहाने २०२२ मध्ये सरकारकडून एअर इंडिया १८,००० कोटी रुपयांना विकत घेतली. परंतु उड्डाणांना विलंब, विशेषतः लांब पल्ल्याच्या मार्गांवर आणि काही विमानांमधील जीर्ण झालेल्या सीट्सच्या तक्रारींमुळे एअरलाइनविरोधात रोष वाढत आहे.

Story img Loader