Air India Toilet News: एअर इंडियाच्या विमानाला हवेतूनच मूळ विमानतळावर परतण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे. विमान प्रवासासाठी प्रवासी हजारो रुपये खर्च करत असतात, मात्र तरीही प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. भारतात अनेकदा असे प्रकार समोर आले आहेत. आता अमेरिकेतही असाच प्रकार घडला आहे. शिकागो येथून दिल्लीसाठी निघालेल्या विमानातील १२ पैकी ८ शौचालये तुंबल्यामुळे विमान हवेतूनच माघारी फिरवावे लागले. एअर इंडियाने याबाबत निवदेन जाहीर केले आहे. शौचालयात प्लास्टिकच्या पिशव्या, चिंध्या आणि कपडे यासारख्या वस्तू फ्लश केल्यामुळे शौचालयाचा पाइप तुंबला होता. ज्यामुळे शौचालय वापरण्यास योग्य नव्हती.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, १२ पैकी आठ शौचालये वापरण्यायोग्य नव्हती. त्यामुळे विमान माघारी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. युरोपमधील एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरविण्याचा पर्याय होता. मात्र तिथे रात्रीच्या वेळी विमानातील तांत्रिक बिघाड दुरूस्त करता येत नाही. त्यामुळे विमान पुन्हा शिकागोत उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर घटना ५ मार्च रोजी घडली. एअर इंडियाने जाहिर केलेल्या निवेदनात म्हटले की, ५ मार्च २०२५ रोजी एअर इंडियाच्या AI126 या विमानाला शिकागोच्या ओहारे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा उतरविण्यात आले होते. त्याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रवाशांची गैरसोय झाली, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या निवेदनात पुढे म्हटले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर एक तास ४५ मिनिटांतच विमानातील १२ पैकी ८ शौचालये निकामी झाली होती.
विमानाने जेव्हा परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विमान अटलांटिक महासागरवर होते. पुढचा प्रवास आणि प्रवाशांची सुरक्षा आणि कुचंबणा लक्षात घेऊन हे विमान माघारी बोलावले गेले.
एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, तपास पथकाला शौचालयामध्ये ब्लँकेट, इनरवेअर आणि डायपर्स अशा वस्तू आढळून आल्या. इतरही विमानांमध्ये अशाच प्रकारच्या वस्तू शौचालयात फ्लश केलेल्या आहेत. शौचालयात अशा वस्तू फ्लश करू नयेत, त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.