Wifi In Domastic Air India Flights : देशातील विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता देशांतर्गत विमानांमध्ये प्रवाशांना इंटरनेट सुविधा मिळणार आहे. त्यामुळे देशांतर्गत प्रवाशी आता विमानातही, सोशल मीडिया, ई-मेल, आवडते कार्यक्रम आणि चित्रपट ऑनलाइन पाहू शकणार आहेत. एअर इंडियाने, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांना वाय-फाय इंटरनेट सेवा पुरवणार असल्याचे आज जाहीर केले आहे. दरम्यान अशा प्रकारची वाय-फाय इंटरनेट सेवा पुरवणारी एअर इंडिया देशातील पहिली एअरलाइन ठरली आहे.
दरम्यान, एअर इंडियाच्या एअर बस ३५०, बोईंग ७८७-९ आणि एअर बस ३२१ निओ या निवडक विमानांमध्येच ही वाय-फाय इंटरनेट सेवा उपलब्ध असणार आहे. एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय विमानांवर यापूर्वीच इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुविधा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सुरुवातीच्या काळात याच विमानांवर ही सुविधा मोफत मिळणार आहे. पुढे हळूहळू ते सर्व विमानांमध्ये ही सुविधा पुरवणार आहेत.
या वाय-फाय सेवेद्वारे प्रवाशांना त्यांचे लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोन्सवर इंटरनेट वापरता येणार आहे. विमान १० हजार फूट उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांची उपकरणे इंटरनेटला जोडण्याची परवानगी मिळणार आहे. असे असले तरी, इन-फ्लाइट इंटरनेट सुविधा कनेक्टिव्हिटी, एकूण बँडविड्थ, मार्ग आणि सरकारी निर्बंध यासारख्या घटकांवर अवलंबून असणार आहे.
याबाबत बोलताना एअर इंडियाचे अधिकारी राजेश डोगरा म्हणाले की, “कनेक्टिव्हिटी हा आता आधुनिक प्रवासाचा अविभाज्य भाग बनला आहे. काहींना रिअल-टाइम शेअरिंगसाठी इंटरनेट लागते तर कोणाला त्यांच्या कामासाठी. उद्देश काहीही असो, आम्हाला खात्री आहे की, आमचे पाहुणे वेबशी कनेक्ट झाल्यानंतर आमचे कौतुक करतील आणि एअर इंडियाच्या नवीन या अनुभवाचा आनंद घेतील.”
दरम्यान विमानात इंटरनेट सेवा पुरवणे ही नवी संकल्पना नाही. अनेक आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये अनेक वर्षांपासून ही सुविधा दिली जात आहे. अलीकडेच, हवाईयन एअरलाइन्सने स्टारलिंकचे लो-ऑर्बिट उपग्रहांचे नेटवर्क वापरून त्यांच्या बऱ्याच फ्लाइटमध्ये विनामूल्य, हाय-स्पीड स्टारलिंक वाय-फाय सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे. युनायटेड एअरलाइन्स आता स्टारलिंकच्या जलद वाय-फाय सेवेची चाचणी करणार आहे. कतारनेही हाय-स्पीड वाय-फाय कनेक्टिव्हिटीसाठी स्टारलिंकसोबत भागीदारी केली आहे.