Air India Flight Bomb Threat News: सोमवारची सकाळ एअर इंडियाच्या मुंबईहून न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळाच्या दिशेनं निघालेल्या विमानातल्या प्रवाशांसाठी प्रचंड धक्कादायक ठरली. तितकीच धक्कादायक ती या प्रवाशांच्या नातेवाईकांसाठीही ठरली. कारण या विमानानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातचं विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सुरक्षा यंत्रणांकडे आली. त्यामुळे खळबळ उडाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे विमान तातडीनं दिल्लीच्या दिशेनं वळवण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यूयॉर्कमधील जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेनं एअर इंडियाच्या AI 119 या प्रवासी विमानानं उड्डाण घेतलं. सोमवारी भल्या पहाटे म्हणजेच २ वाजताच्या सुमारास विमान हवेत झेपावलं. पण काही वेळातच हे विमान नियोजित मार्गावरून दिल्लीच्या दिशेनं वळवण्यात आलं. विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेनं निघाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.

हे विमान सध्या दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं आहे. तिथे सगळ्यात आधी विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. यानंतर विमानाची पूर्ण तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलं. “सध्या हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं आहे. विमानातील प्रवासी व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व मार्गदर्शक सूचना व स्टँडर्ड प्रोटोकॉलचं पालन केलं जात आहे”, अशी माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली.

सोशल मीडियावरून आली होती धमकी!

या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सोशल मीडियावरून आल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. पहाटे २ वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेलं हे विमान पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. तसेच, यावेळी प्रवाशांना त्यांचं सामान विमानातच ठेवण्याची सूचना करण्यात आली. यानंतर संपूर्ण विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली.

एअर इंडियाचं काय आहे म्हणणं?

दरम्यान, एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. “मुंबई ते न्यूयॉर्क एआय ११९ या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी १४ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली. त्यानंतर सरकारच्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करत हे विमान दिल्लीला वळवण्यात आलं. सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं असून सध्या ते सर्व दिल्ली विमानतळाच्या टर्मिनलमध्ये सुखरूप आहेत. आमचे सर्व सहकारी प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा याला एअर इंडियाच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य आहे”, असं ते म्हणाले.