एअर इंडियाच्या विमानात प्रवासी आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सिडनी-दिल्ली विमानात हा प्रकार घडला आहे. एका प्रवाशाने विमानात आधी गोंधळ घातला, त्यानंतर विमान कंपनीच्या अधिकाऱ्याशी वाद घातला. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या माहितीनुसार आरोपीला संरक्षण यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. याप्रकरणी इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एक वरिष्ठ अधिकारी सिडनीहून दिल्लीला जात होते. त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट बूक केलं होतं. परंतु काही कारणास्तव त्यांची सीट बदलण्यात आली. त्यांना बिझनेस क्लासमधून इकोनॉमी क्लासमधील सीट देण्यात आली. त्यांना इकोनॉमी क्लासमधील ३०सी ही सीट अलॉट करण्यात आली होती.
इकोनॉमी क्लासमध्ये बसल्यानंतर या अधिकाऱ्याने विमानात मोठ्या आवाजात बोलणाऱ्या एका सहप्रवाशाला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो सहप्रवासी वाद घालू लागला. तसेच त्याने या अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यावेळी एअर इंडियाचा केबिन क्रू त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होता. तरीदेखील तो थांबला नाही.
प्रवाशाने आधी त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, त्यानंतर त्याचा गळा आवळला, तसेच शिवराळ भाषेत अपमान केला. यावेळी केबिन क्रूमधील पाच सदस्य मिळून त्याला रोखू शकले नाहीत. परिणामी एअर इंडियाचे अधिकारी त्या सीटवरून उठले आणि मागच्या सीटवर जाऊन बसले. त्यानंतर हा प्रवाशी विमानातील प्रवाशांसाठी ठेवलेल्या वस्तूंची मोडतोड करत होता, विमानात फिरत होता. त्यामुळे या प्रवाशाला बजावण्यात आलं, तसेच त्याला लिखित इशारा देण्यात आला.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने या घटनेची माहिती देताना सांगितलं की, ही घटना ९ जुलै २०२३ ची आहे. एअर इंडियाच्या एआय – ३०१ या विमानाने सिडनीहून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळाने एका प्रवाशाने विमानात गोंधळ सुरू केला. त्यानंतर त्याला तोंडी आणि लेखी इशारे देण्यात आला. तरीही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. या गोंधळामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच आमचा एक कर्मचारीही असभ्यतेचा बळी ठरला.
हे ही वाचा >> “कोणाला किती दिवस बरोबर ठेवायचं आणि…”, भाजपा आमदाराचं मोठं वक्तव्य…
एअर इंडियाने म्हटलं आहे की, विमान दिल्लीत उतरल्यानंतर त्या प्रवाशाला सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर प्रवाशाने लेखी माफी मागितली. डीजीसीएला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या गैरव्यवहाराविरोधात विमान कंपनी कठोर भूमिका घेईल. तसेच याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.