Air India Flight : दिल्लीहून मुंबईला जाणारे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाल्याने दिल्ली विमानतळावर संतापलेल्या प्रवाशांनी राडा घातल्याची घटना समोर आली आहे. यादरम्यान चिडलेल्या एका प्रवाशाने विमान कंपनीच्या एका कर्मचार्‍याच्या कानशि‍लात लगावल्याने ही परिस्थिती जास्तच तणावपूर्ण बनली.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिडलेले प्रवासी पाहायला मिळत आहेत. हे विमान रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उड्डाण करणार होते, मात्र त्यासाठी सात तास उशीर झाला. अखेर विमान सकाळी ६.३० मिनिटांनी उड्डाण केले. यामुळे प्रवाशांना रात्रभर अडकून पडावे लागले. प्रवाशांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना अंधारात ठेवण्यात आले. त्यांच्याबरोबर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, तसेच त्यांना उशिर होण्याचे कारण देखील सांगण्यात आले नाही.

कंटेंट क्रिएटर गरिमा रांओंटा (Garima Raonta) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तेथे लहान मुले रडत होती, थकलेले वृद्ध प्रवासी होते, आणि खूप महत्त्वाच्या कामासाठी मुंबईत निघालेले लोक होते. आम्हाला बदल्यात काय मिळालं? मनापासून न मागितलेली माफी आणि ज्यूस बॉक्स. हो, एक ज्यूस बॉक्स. आमचा वेळ, आम्हाला आलेला ताण आणि आरोग्य याची त्यांच्यासाठी हीच किंमत होती.”

एअरलाइन कंपनीच्या कर्मचार्‍यांकडे जाऊन अनेक प्रवाशांनी चौकशी केली. एका घटनेत संतापलेल्या प्रवाशाने क्रू मेंबरला मारहाण देखील केली. “मेरे बाप की तबियत खराब है। हमारी समस्या समझो ना,” अशी विनवणी देखील त्याने एअरलाइनच्या कर्मचार्‍यांकडे केली

या व्हिडीओमध्ये पुढे एक प्रवाशी एअरलाइन कर्मचाऱ्याला जाब विचारताना दिसत आहे. हा कर्मचारी वादा दरम्यान हसत असल्याचा आरोप आहे.

गरिमा यांनी लिहीलेल्या पोस्टनुसार, एअरलाइनने बोर्डिंग प्रक्रिया सुरू केली पण ती मध्येच थांबवली. अर्धे प्रवासी विमानात चढल्यानंतर उड्डाणाला आणखी वेळ लागणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. अर्धवट बोर्डिंग पूर्ण झाल्यानंतर बोर्डिंग गेट लॉक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच गरिमा यांनी पुढे असा दावा केला की उशिराचे मुख्य कारण विमानासाठी पायलट उपलब्ध नसणे हे होते.

या घटनेनंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एअर इंडियावर टीका केली आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी त्यांचे म्हणणे व्यक्त केले आहे.