एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत एका प्रवाशाने एका वृद्धा महिलेवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी संबंधित आरोपी शंकर मिश्राला ( ३४ ) बंगळुरु येथून अटक करण्यात आली होती. अशातच शुक्रवारी शंकर मिश्राला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा शंकर मिश्राने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

याप्रकरणी शुक्रवारी दिल्लीतील पटियाला न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा “मी महिलेवर लघुशंका केलीच नाही. त्या महिलेने स्वत:च लघुशंका केली,” असं आरोपी शंकर मिश्राने न्यायालयात सांगितलं.

हेही वाचा : काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन; ‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना ह्रदयविकाराचा झटका

तर, शंकर मिश्राच्या वकिलांनी युक्तीवाद करताना न्यायालयात म्हटलं की, “अनेक कत्थक नर्तकांना असतो, सता पोस्टेटशी संबंधित मूत्रविकार या महिलेला आहे. आसनव्यवस्था अशी होती की कुणी तिच्या आसनाजवळ जाऊ शकत नव्हतं. तिच्या जागेजवळ मागूनच जाता येणं शक्य होतं. तसेच, कुठल्याही परिस्थितीत मूत्र तिच्या आसनाच्या समोरच्या भागात पोहचू शकत नव्हतं. शिवाय तक्रारदार महिलेच्या पाठीमागे बसलेल्या कोणीही तक्रार केलेली नाही.”

हेही वाचा : IPL चे माजी अध्यक्ष ललित मोदी एक आठवड्यापासून ऑक्सिजन सपोर्टवर

आरोपीच्या युक्तीवादानंतर महिलेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “शंकर मिश्राने केलेला दावा खोटा आहे. जामीन अर्जासाठी आरोपीने आपला जबाब पूर्णपणे बदलला आहे,” असं महिलेने सांगितलं आहे.