मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सून भारतात दाखल झाला आहे. रविवारी (२५ जून) दिल्ली-मुंबईसह देशातल्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. पाऊस आणि खराब हवामानामुळे रविवारी अनेक विमानांची उड्डाणं उशिराने झाली तर काही ठिकाणी विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. दिल्ली विमानतळावरून विमानांची उड्डाणं करण्यात आणि आलेली विमानं उतरवण्यात खूप अडचणी येत होत्या. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफमध्ये अडचणी येत होत्या. याचदरम्यान, लंडनहून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान एआय-११२ खराब हवामानामुळे दिल्लीत उतरवता आलं नाही. अशा स्थितीत विमान आकाशातच घिरट्या घेत होतं. विमानतळ प्रशासनाने १० मिनिटं वाट पाहिली. त्यानंतर हे विमान जयपूरच्या दिशेने वळवण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या काळात परदेशातून दिल्लीला येणारी, तसेच अनेक देशांतर्गत विमानं जयपूरला डायव्हर्ट करण्यात आली. दोन तासांनी हवामान सुधारलं. त्यानंतर दिल्ली विमानतळ प्रशासनाने क्लिअरन्स दिला. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर जयपूरला उतरवण्यात आलेली विमानं एकापाठोपाठ एक दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आली. परंतु लंडनहून दिल्लीला येणारं विमान तीन तास झाले तरी दिल्लीच्या दिशेने रवाना झालं नव्हतं. कारण पायलटने विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिला होता.

लंडनहून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं एआय-११३ हे विमान पायलटने उडवण्यास नकार दिला. त्याची ड्युटी संपली आहे, असं म्हणत त्याने विमान उडवण्यास नकार दिला. एवढं बोलून हा पायलट विमानातून उतरला.

बहुतांश प्रवाशांना बसने जयपूरहून दिल्लीला पाठवलं

पायलटच्या या निर्णयामुळे सकाळी ४ वाजता दिल्लीला पोहचणारं विमान अनेक तास उलटले तरी जयपूर विमानतळावरच उभं होतं. विमानात बसलेले अनेक प्रवासी वैतागले. पाच तासांहून विमान उभंच होतं. त्यामुळे विमानातील ३५० प्रवाशांपैकी काही प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यात आलं. विमान दिल्लीला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या क्रू मेंबर्सची व्यवस्था करण्यात आली. उरलेल्या प्रवशांना घेऊन काही तासांनी विमान जयपूरहून दिल्लीला आलं.

हे ही वाचा >> कुस्तीगीरांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “न्यायालय…”

एअर इंडियाने काय म्हटलं?

दरम्यान, एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत निवेदनाद्वारे सांगितलं की, लंडनहून येणारं एआय-११२ हे विमान सकाळी ४ वाजता दिल्लीला उतरवणं अपेक्षित होतं. परंतु खराब हवामानामुळे आणि खराब दृष्यमानतेमुळे ते जयपूरला डायव्हर्ट करण्यात आलं. हवामान सुधारण्यास खूप वेळ लागला. त्यादरम्यान कॉकपिट चालक दलाचा ड्युटी डाईम लिमिटेशन (FDTL) अवधी संपला होता. (म्हणजेच पायलट किती वेळ विमान चालवू शकतो याची एक मर्यादा असते. हा पायलट लंडनहून विमान घेऊन आला होता. त्यानंतर काही तास तो जयपूरमध्ये वाट पाहत होता.) नियामक प्राधिकरणांनी निर्धारित केलेल्या एफडीटीएलअंतर्गत आल्यानंतर पायलट विमान चालवू शकत नाहीत. एअर इंडिया कंपनी त्यांचे प्रवाशी आणि पायलटसह क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देते. तसेच विमान संचालनाच्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच आम्ही त्या विमानाच्या उड्डाणासाठी तातडीने नव्या क्रूची व्यवस्था केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india pilot refuses to fly delayed london delhi flight 350 passengers made to wait for hours asc