रविवारी रात्री राजकोट विमानतळावर विचित्र घटना घडली आहे. राजकोटहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकाने उड्डाण घेण्यास नकार दिल्याने भारतीय जनता पार्टीच्या तीन खासदारांसह जवळपास १०० प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे उड्डाण रद्द होण्यापूर्वी प्रवाशांना दोन तास विमानात बसून राहावं लागलं. माझी ड्युटी संपली आहे, असं कारण देत वैमानिकाने उड्डाण घेण्यास नकार दिला होता. अखेरीस उड्डाण रद्द झाल्यानंतर संबंधित प्रवाशांना गंतव्यस्थानी (Destination) पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानात प्रवासी चढत होते. यावेळी वैमानिकाने उड्डाण घेण्यास नकार दिला. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मनस्ताप सहन करावा लागणाऱ्या प्रवाशांमध्ये राजकोटचे भाजपा खासदार मोहन कुंडारिया, जामनगरच्या खासदार पूनम मादम आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार केसरीदेवसिंह झाला (Kesaridevsinh Jhala) हे होते.

भाजपा खासदार कुंडारिया यांनी सांगितलं की, “ड्युटी संपल्याचं कारण देत वैमानिकाने विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्यानंतर आम्ही दोन तास विमानात बसून होतो. ते ‘टेक ऑफ’ करतील, यासाठी आम्ही वाट पाहत राहिलो. याबाबत आम्ही दिल्लीतील अधिकार्‍यांशी संवाद साधला. राजकोट विमानतळावरील या प्रकाराबद्दल तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही. कारण पायलटने सांगितलं की, ते पुढे उड्डाण करू शकत नाहीत. कारण ते खूप थकले आहेत. अखेरीस, आम्ही रात्री साडेदहाच्या सुमारास विमानातून खाली उतरलो.”

राजकोटमधील स्थानिक एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. त्यांना मीडियाशी बोलण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी सांगितलं. राजकोट विमानतळाचे संचालक दिगंत बोराह यांनी सांगितलं, “ही एअरलाइनची अंतर्गत समस्या होती”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india pilot refuses to fly said duty over 100 passengers stranded including 3 bjp mp rmm
Show comments