केरळचे राज्यपाल पी. सथशिवम यांना मंगळवारी रात्री कोची विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्यानंतर एअर इंडियाच्या वैमानिकाने त्यांच्यासाठी विमान थांबविण्यास नकार दिला. त्यामुळे पी. सथशविम यांना विमातळावरूनच माघारी परतावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपाल कोचीन विमानतळावर विमान सुटण्याच्या दहा मिनिटे आधी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत विमानात चढण्यासाठीची शिडी काढण्यात आली होती. एअर इंडियाच्या व्यवस्थापकांनी वैमानिकाला राज्यपाल येत असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्याने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास नकार देत विमानाचे दरवाजे बंद केले. एअर इंडियाचे ए १०४८ हे दिल्ली-कोची-तिरूअनंतपुरम विमान रात्री ११.४० वाजता उड्डाण करणार असल्याची माहिती आम्हाला एअर इंडियाकडून देण्यात आली होती. मात्र, राज्यपाल आणि त्यांची पत्नी ११ वाजून २८ मिनिटांनी विमातळावर आले. त्यावेळी विमानाची शिडी काढून घेण्यात आली होती आणि विमान धावपट्टीच्या दिशेने नेण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यपाल येण्यापूर्वी एअर इंडियाचे अधिकारी विमानाजवळ त्यांचा बोर्डिंग पास घेऊनदेखील हजर होते. याबद्दल एअर इंडिया प्रशासनाला विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, विमानाचे दरवाजे बंद होऊन विमान धावपट्टीवर जात असताना राज्यपाल विमानतळावर आले. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर राज्यपाल पी. सथशिवम यांनी एका रात्रीसाठी कोचीतच मुक्काम केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते रस्त्याने प्रवास करत तिरूअनंतपुरम येथे पोहोचले.
एअर इंडियाच्या वैमानिकाने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास दिला नकार
राज्यपाल कोचीन विमानतळावर विमान सुटण्याच्या दहा मिनिटे आधी दाखल झाले
Written by रोहित धामणस्कर
First published on: 23-12-2015 at 17:42 IST
TOPICSपी सथशिवम
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india pilot refuses to wait for kerala governor takes off