दिल्ली-एनसीआर मध्ये प्रदुषणाने गंभीर पातळी गाठली असून हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. हे सर्वांसाठीच अत्यंत धोकादायक बनत आहे. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांना याचा अधिक धोका जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक प्रशासनाकडून काही तातडीची पावलं उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता गौतमबुद्ध नगरमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
८ नोव्हेंबरपर्यंत ही व्यवस्ता अनिवार्य स्वरूपात लागू असणार आहे. यासंबधीचा शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. तर या आदेशात असेही म्हटले आहे की, इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांचेही ऑनलाईन वर्ग सुरू केले जाऊ शकतात.
दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. एअर क्वालिटी इंडेक्स(AQI) सद्यस्थितीस नोएडा(यूपी) मध्ये ५६२ गंभीर श्रेणी, गुरुग्राम(हरियाणा) – ५३९ गंभीर श्रेणी आणि दिल्ली विद्यापीठ परिसर ५६३- गंभीर श्रेणीत आहे. दिल्लीचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स सध्या ४७२ वर गंभीर श्रेणीत आहे.
गौतमबुद्ध नगर जिल्हा शाळा निरीक्षक(डीआयओएस) धर्मवीर सिंह यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, शाळांना सूचित करण्यात आले आहे की, जर शक्य असेल तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्गही ऑनलाईन केले जावेत. याशिवाय वर्गाबाहेर कार्यक्रम जसे की प्रार्थना, मैदानी खेळ आदींवर पूर्णपणे निर्बंध आणण्यात आले आहेत. धर्मवीर सिंह यांनी म्हटले की, सर्व शाळांना इयत्ता आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले जात आहेत. याशिवाय त्यांना शक्य झाल्यास इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्गही ऑनलाइन स्वरूपात घेण्यास सांगितले आहे.
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये (एनसीआर) हवेची पातळी आणखी खालावल्यानंतर तातडीचे उपाय योजण्यात आले आहेत. ‘श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती आराखडा’ (जीआरएपी) अंतर्गत डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली असून ट्रकना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दुसरीकडे खराब हवेमुळे दवाखान्यांमध्ये श्वसनाच्या विकारांवरील रुग्णांची गर्दी वाढताना दिसत आहे.