मृतात १७ नागरिक, १३ दहशतवादी
तालिबानने येथील हवाई दलाच्या विमानतळावर केलेल्या हल्ल्यात ४२ जण ठार झाले. त्यात १७ नागरिक व १३ दहशतवाद्यांचा समावेश आहे. विमानतळाबरोबरच तेथे असलेल्या मशिदीवरही हल्ला करण्यात आला.
अंगावर स्फोटके बाळगणाऱ्या बंदूकधाऱ्यांनी सुरक्षा चौकीवर एके ४७ रायफलींच्या मदतीने हल्ला केला. नंतर ते बदाबेर येथील हवाई दलाच्या तळावर घुसले. खैबर पख्तुनवा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावर शहराच्या बाहेरच्या भागात हा हवाई दलाचा विमानतळ आहे. सुरक्षा दलांनी तेरा दहशतवाद्यांना ठार केले, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीम बाजवा यांनी म्हटले आहे. हवाई दलाच्या छावणीत असलेल्या मशिदीत सोळाजण नमाज पढत होते त्यांना दहशतवाद्यांनी ठार केले. रुग्णालयातील डॉक्टरने सांगितले की, एक अज्ञात मृतदेह येथे आणण्यात आला. दहशतवाद्यांनी दोन ठिकाणांहून छावणीत प्रवेश केला. ते दोन गटात विभाजित झाले व नंतर त्यांनी सुरक्षा दलांशी झटापट केली असे सांगण्यात आले. या हल्ल्यात आठ सैनिकांसह २२ जण तसेच इतर दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी जखमी झाले असून त्यांना पेशावरच्या लष्करी रुग्णालयात दाखल केले आहे. दोनजणांना लेडी रीडिंग हॉस्पिटल येथे दाखल केले असून दोन्ही रुग्णालयात आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्या आत्मघाती पथकाने हा हल्ला केला असे संघटनेचा प्रवक्ता महंमद खुरसानी याने सांगितले. त्याने केलेल्या दाव्यानुसार सुरक्षा दलाच्या ८० जवानांना दहशतवाद्यांनी वेढा घातला व त्यातील पन्नास जणांना ठार केले, पण त्याची खातरजमा झालेली नाही. त्याने असाही दावा केला की, महिला व मुलांना सुरक्षित जाऊ देण्यात आल्याच्या माहितीची सत्यता पटलेली नाही. बाजवा हे या घटनेनंतर तेथे पोहोचले पण तेथे तुंबळ धुमश्चक्री सुरू होती. लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी काळे पोशाख व पांढरे बूट घातलेले होते. स्फोटाचे व गोळीबाराचे आवाज ऐकू आले. कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल हिदायतुर रेहमान यांनी हवाई दल विमानतळाची हवाई पाहणी केली. आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. लष्कर प्रमुख राहील शरीफ पेशावरला रवाना झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवाद मुळापासून नष्ट केला जाईल असे म्हटले आहे. बडाबेर हवाईतळ हा चालू अवस्थेत नव्हता. तेथे हवाई दलाचे कर्मचारी व अधिकारी राहात
होते. पेशावरला दहशतवाद्यांनी नेहमीच लक्ष्य बनवले आहे. तालिबानने एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात गेल्या डिसेंबरमध्ये १५० मुले मरण पावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा