मुंबई : ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पापाठोपाठ ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, हा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असफल ठरला असून, त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रात सुरू व्हावा, यासाठी आधी महाविकास आघाडी आणि नंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न केले होते. परंतु, हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा या कंपनीने केली. त्यावेळी ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी महाराष्ट्राला तेवढाच मोठा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. एअरबस आणि टाटा यांचा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांनी हा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, हा प्रकल्पही गुजरातला गेल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.
हेही वाचा >>> आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये; वायू दलाची सी-२९५ मालवाहू विमानं बनणार बडोद्यात
भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी हा समारंभ होणार आहे. ‘‘या प्रकल्पातून भारतीय हवाई दलासाठी विमानांची निर्मिती होईल. तसेच तेथे तयार झालेल्या विमानांची निर्यातही होणार आहे. यामुळे भारतीय विमाननिर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे,’’ असे संरक्षण सचिव अजयकुमार यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस कंपनीशी २१ हजार कोटींचा करार केला होता. त्याअंतर्गत जुन्या अॅॅवरो-७४८ विमानांची जागा सी-२९५ ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. बडोद्यातील हा प्रकल्प २१,९३५ कोटी रुपयांचा असून येथे तयार होणारी विमाने प्रवासी वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकतात, अशी माहिती कुमार यांनी दिली. विमानाच्या ९६ टक्के भागांची निर्मिती भारतात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यात सध्यातरी विमानाच्या इंजिनाचा समावेश नाही.
देशातील असा पहिला प्रकल्प
सी-२९५ विमानांचा पहिला ताफा (१६ विमाने) सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या काळात स्पेनच्या सेविले येथील कारखान्यातून मिळणार आहे. उर्वरित ४० विमाने ही टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स या कंपनीच्या भागीदारीतून भारतात तयार केली जातील. भारतात बनलेले पहिले विमान सप्टेंबर २०२६मध्ये वायूदलाच्या ताफ्यात येईल. युरोपच्या बाहेर सी-२९५चे उत्पादन होण्याचीदेखील ही पहिलीच वेळ आहे.
तीन प्रकल्प राज्याबाहेर
‘वेदान्त- फॉक्सकॉन’प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार होता. तो प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. ‘बल्क ड्रग्ज प्रकल्प’ राज्यात उभारण्याची योजना होती. पण, हा प्रकल्प आता आंध्र प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे. यापाठोपाठ हवाई दलासाठी विमान निर्मितीचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक उपसमितीने सप्टेंबर २०२१ मध्ये हवाई दलाच्या विमान निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. टाटा आणि एअरबस कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याबाबत करार केला नव्हता. मात्र, हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले होते.
स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न; भाजपचे प्रत्युत्तर
‘एअरबस-टाटा’ प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच झालेला असताना आता त्यावर टीका करणे म्हणजे, महाविकास आघाडीने स्वत:चे पाप झाकण्यासारखे आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर ८ सप्टेंबर २०२१ रोजी मे. एअरबस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी संरक्षण मंत्रालयाशी सामंजस्य करार झाला. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एकही पत्र पाठवले नाही किंवा कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिशाभूल करू नये, असेही ते म्हणाले.
हे सरकारचे अपयश : आदित्य ठाकरे</p>
‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्यावेळी किमान विमाननिर्मितीचा प्रकल्प तरी राज्यात खेचून आणा, असे आवाहन आम्ही केले होते. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार, असे राज्याचे उद्योगमंत्री म्हणाले होते. मात्र, हाही प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यामुळे हे सरकारचे अपयश असून, सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याचे दिसते, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. हे घटनाबाह्य सरकार आल्यापासून अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत, असेही ते म्हणाले.