Illegal Indian Immigrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना भारतात आणलं जात आहे. आज टेक्सासहून २०५ नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान भारतात येण्यासाठी निघाले आहे. दरम्यान, या विमातनात २०५ नागरिकांसाठी फक्त एकच टॉयलेट असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अमेरिकन लष्कराचे एक C-17 विमान भारतीय नागरिकांना घरी परत आणत आहे. अमेरिकन हवाई दलाच्या C-17 विमानात २०५ प्रवाशांसाठी एकच शौचालय आहे. अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक भूमिकेनुसार बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथील नागरिकांना त्यांच्या मायदेशी सुखरुप पाठवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार असल्याच्या वृत्तांदरम्यान बेकायदेशीर भारतीय नागरिकांना हद्दपार करण्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असेल. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यापूर्वी म्हटले होते की, अमेरिकेसह परदेशात ‘बेकायदेशीरपणे’ राहणाऱ्या भारतीय नागरिकांना ‘कायदेशीरपणे परत’ आणण्यासाठी नवी दिल्ली तयार आहे.
“इतिहासात पहिल्यांदाच, आम्ही बेकायदेशीर परदेशी लोकांना शोधून त्यांना लष्करी विमानात भरत आहोत आणि ते जिथून आले होते तिथे परत पाठवत आहोत”, असे ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात पत्रकारांना सांगितले.
१८ हजार भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले होते की बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत घेण्याबाबत भारत जे योग्य आहे ते करेल. ब्लूमबर्ग न्यूजच्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेने अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या १८,००० भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली आहे. बेकायदेशीर नागरिक संघटितरित्या गुन्ह्यांशी जोडलेले असतात, त्यामुळे अशा नागरिकांना मायदेशी पाठवले जाते, असं परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.
“केवळ अमेरिकेतच नाही तर जगात कुठेही राहणारे भारतीय, जर ते भारतीय नागरिक असतील आणि ते मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य करत असतील किंवा योग्य कागदपत्रांशिवाय एखाद्या विशिष्ट देशात असतील, तर आम्ही त्यांना परत घेऊ.आम्हाला त्यांची कागदपत्रे मिळाल्यास आम्ही त्यांचे राष्ट्रीयत्व पडताळू शकू आणि ते खरोखरच भारतीय आहेत याची पडताळणी करू शकू. जर तसे झाले तर आम्ही गोष्टी पुढे नेऊ आणि त्यांना भारतात परत आणण्याची सुविधा देऊ”, असे मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.