तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात एक विमान कोसळल्याची घटना घडली. यात एका महिला वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी ११ वाजता ही घटना घडली. यात मृत्यू झालेल्या २९ वर्षीय महिला वैमानिकाचं नाव महीमा गजराज (Maheema Gajaraj) असं आहे. ही महिला वैमानिक चेन्नईमधील रहिवासी असून हैदराबादमधील फ्लायटेक एव्हिएशन अकॅडमीत प्रशिक्षण घेत होती.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “प्रशिक्षण घेत असलेली महिला वैमानिक महीमा गजराजने सकाळी साडेदहा वाजता सिस्ना १५२ (Cessna 152 aeroplane) या विमानासह नालगोंडातून उड्डान केलं. १० वाजून ५० मिनिटांनी या विमानाचा अपघात झाला.” प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हवेतच विमानावरील नियंत्रण सुटल्याचं दिसलं. त्यानंतर विमान जमिनीवर कोसळलं. यावेळी मोठ्या स्फोटाचा आवाज झाला.
या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “नालगोंडामधील प्रशिक्षण देणाऱ्या विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला. तपास पथक घटनास्थळावर पोहचलं आहे. दुर्दैवाने आपण प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाला गमावलं आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना.”
हेही वाचा : व्हायरल व्हिडीओ: एअर इंडियाचे विमान अडकले दिल्ली विमानतळाजवळच्या फुट ओव्हर ब्रिजखाली
विमान दुर्घटना कशामुळे?
हवेत उच्चदाबाच्या विद्युतवाहिनी तारांना धडक झाल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. यानंतर विमान कोसळलं. या परिसरात सर्वत्र विमानाचे अवशेष पाहायला मिळत आहेत. या विमानाला दोन सीट असल्याने प्रथमदर्शनी विमानात दोन लोक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, नंतर विमानात एकच वैमानिक असल्याचं समोर आलं.