मुंबईहून १८० प्रवाशांना घेऊन निघालेल्या इंडिगो कंपनीचे विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याच भागात उत्तर प्रदेश सरकारचे हेलिकॉप्टर उतरत असल्याचे दिसून आल्याने वैमानिकाने विमान उतरवण्याचे टाळले, त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे. काल सायंकाळी येथील चौधरी चरणसिंग विमानतळावर विमान व हेलिकॉप्टर हे एकाच वेळी बहुतांशी एकाच भागात उतरण्याचा प्रकार घडत होता. वैमानिकाला त्याच ठिकाणी हेलिकॉप्टर दिसल्याने त्याने विमान उतरवण्याचे टाळले असे विमानतळाचे संचालक व हवाई वाहतूक नियंत्रक एस. सी. होटा यांनी सांगितले. ते हेलिकॉप्टर खूप जवळ असल्याचे वैमानिकाला दिसून आले होते. इंडिगोचे एअरबस ३२० हे विमान १८० प्रवाशांना घेऊन आले होते. त्यात सहा बालकांचा समावेश होता. तसेच विमान कंपनीचे आठ कर्मचारी विमानात होते. सरकारी हेलिकॉप्टरमध्ये कोण प्रवासी होते हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही. होटा यांनी सांगितले, की विमान व हेलिकॉप्टर अशा दोघांनीही प्रचलित नियम व पद्धतींचा अवलंब केलेला होता. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकाला विमान उतरवण्याची सूचना दिली होती, असा दावा विमान कंपनीच्या सूत्रांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा