पाकिस्तानच्या लष्कराने केलेले हवाई हल्ले आणि दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केल्यानंतर लष्कराने केलेल्या गोळीबारात जवळपास ६० दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
अफगाणिस्तानच्या सीमेवरील शिंदारा आणि खजाना कांडाव येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला चढविला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या गोळीबारात २० दहशतवादी ठार झाले तर अन्य २० जण जखमी झाले. या चकमकीत लष्कराचे चार सैनिकही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेशावरला आणण्यात आले आहे.
दत्तखेल परिसरात पाकिस्तानच्या लढाऊ जेट विमानांद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात दोन कमांडरांसह ३९ दहशतवादी ठार झाले, असे लष्कराचे प्रवक्ते आसिम बाजवा यांनी ट्विट केले आहे. दरम्यान शुक्रवारी पाकिस्तानातून १०० संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
पेशावर शाळेवर दहशतवादी हल्ला करून १५० जणांना मुख्यत्वे लष्करी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ठार मारण्यात आल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक
भूमिका घेत मोहीम अधिकाधिक तीव्र केली असून १२०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.