गुजरात विधानसभा निवडणूक निकालांबाबत तुमचे मत काय? असा प्रश्न काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते मणिशंकर अय्यर यांना विचारण्यात आला. ज्यावर मणिशंकर अय्यर यांची बोलती बंद झाल्याचे बघायला मिळाले. ‘वाचाळवीर’ असा लौकिक असलेले मणिशंकर अय्यर यांनी या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केले. एखादा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि त्यावर त्यांनी त्यांनी त्यांचे मत मांडले नाही ही बहुदा पहिलीच वेळ असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नीच’ असे संबोधत मणिशंकर अय्यर यांनी टीका करताना सगळी पातळी सोडली होती. ज्याचा पुरेपूर समाचार नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात घेतला.
शुक्रवारी कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान मणिशंकर अय्यर यांना ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने गुजरात निकालांबाबतचे मत विचारले. त्यावर चक्क मौन बाळगणेच मणिशंकर अय्यर यांनी पसंत केले. एवढेच नाही तर त्यांनी कॅमेराकडेही पाहिले नाही. रिपोर्टरने त्यांना पुन्हा प्रश्न विचारला मात्र मणिशंकर अय्यर यांनी हा आपल्याला काही विचारतच नाही अशा अविर्भावात पेपर वाचण्यास सुरूवात केली. एकही शब्द न बोलता ते दुर्लक्ष करत राहिले. त्यांचा हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.
मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या टीकेनंतर काँग्रेसमधून अय्यर यांना निलंबित करण्यात आले. तसेच त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातून टीका झाली. राहुल गांधी यांच्या प्रचाराला गुजरातमध्ये चांगला प्रतिसाद मिळत होता. गुजरात निवडणूक निकाला दरम्यान काँग्रेस आणि भाजपची ‘काँटे की टक्कर’ बघायला मिळाली. मात्र मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्याचमुळे त्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आले. आता शुक्रवारी याच मणिशंकर अय्यर यांना गुजरातबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळत मौन बाळगणे पसंत केले.
पाहा व्हिडिओ-
#WATCH: Mani Shankar Aiyar refuses to answer a question on #GujaratElection results, at an event in #Kolkata pic.twitter.com/k1v8hBnb1Q
— ANI (@ANI) December 22, 2017