बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा भाऊ अनिल देवगणचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री अनिलने जगाचा निरोप घेतला. अजयने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली असून अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अजयने ट्विटमध्ये अनिलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘काल रात्री माझा भाऊ अनिल देवगणचे निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वांना दु:ख झाले आहे. मला त्याची कायम आठवण येईल. या महामारीमुळे आम्ही पर्सनल प्रेअर मीटचे आयोजन केलेले नाही’ या आशयाचे ट्विट केले आहे.

अजयच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. अनिल हा अजय देवगणचा चुलत भाऊ असून एक दिग्दर्शक होता. त्याने आजवर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने राजू चाचा, ब्लॅक मेल आणि हाल-ए-दिल चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. या व्यतिरिक्त त्याने सन ऑफ सरदार चित्रपटासाठी क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले होते. अनिलने अजय देवगणच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

यापूर्वी २७ मे २०१९ रोजी अजय देवगणचे वडिल बॉलिवूड स्टंट दिग्दर्शक वीरु देवगण यांचे निधन झाले होते. त्यावेळी अजय देवगणने एक भावूक पोस्ट करत वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती.