केंद्राला म्हणणे मांडण्याचे आदेश

सीबीआयने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवल यांचे दूरध्वनी बेकायदेशीरपणे टॅप केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली असून त्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्या. व्ही. के. राव यांच्या पीठाने सीबीआयला नोटीस पाठविली असून याचिकेबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. अशा प्रकारच्या कारवाया देशासाठी अतिधोकादायक आहेत, असे याचिकेमध्ये म्हटले आहे.

सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी दूरध्वनी टॅपिंगबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असे सार्थक चतुर्वेदी या याचिकाकर्त्यांने म्हटले आहे. डोवल आणि अन्य यांचे दूरध्वनी टॅप करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले होते का, असा सवालही करण्यात आला आहे.

Story img Loader