महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द कायम वादळी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतसिंह कोश्यारी चर्चेत आले होते. आता भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असं मिश्किल विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भगतसिंह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,” असं कोश्यारी यांनी म्हटलं.

हेही वाचा : “अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी…”, काँग्रेस नेत्याचं विधान

“संघटनेत अजित पवारांची ताकद”

“मला कधीकधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं,” असेही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

हेही वाचा : “तुमच्या घरी छापा पडला तर पक्षानं काय करायचं?” शरद पवारांनी हसन मुश्रीफांना सुनावलं!

“शरद पवारांचा आदर करतो”

“शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत,” असं कौतुक भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवार यांचं केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar always ready take oath deputy cm say former governor bhagatsingh koshyari ssa