Kamlesh Kumar Singh : विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीबरोबर आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भाजपाने एक मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा झारखंडमधील एक आमदार भाजपाने फोडला आहे. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार कमलेश कुमार सिंह हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपाचे झारखंडचे निवडणूक सह-प्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची आमदार कमलेश कुमार सिंह यांनी रांची येथे भेट घेतली असून कमलेश कुमार हे ३ ऑक्टोबर रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कमलेश कुमार सिंह हे पलामूमधील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कमलेश कुमार हे १९९९ पासून झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) काम करतात. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहेत. यासंदर्भातील वत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : “मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!

कमलेश कुमार सिंह हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर मुलगा सूर्य सिंह हे पक्षाचे प्रवक्ते आहेत. पत्रकारांशी बोलताना सूर्य सिंह यांनी भाजपातील प्रवेशासंदर्भात बोलताना सांगितलं की, “भगवा पक्ष सबका साथ सबका विकासवर विश्वास ठेवतो. राज्याच्या राजकारणात प्रतिनिधित्व सुनिश्चित करताना पक्ष आदिवासी आणि बिगर आदिवासी अशा दोन्ही समुदायांना प्राधान्य देतो.”

सूर्य सिंह यांनी असंही म्हटलं की, कमलेश कुमार सिंह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही वरिष्ठ भाजपा नेत्यांशी चर्चा केली आहे. सध्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) एक भाग आहे. मात्र, तरीही कमलेश सिंह यांची भाजपात सहभागी होण्याची इच्छा आहे, असं त्यांनी म्हटलं.

कमलेश सिंह कोण आहेत?

कमलेश सिंह हे १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी २००५ ची झारखंड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली. तसेच ते २००९ पर्यंत कॅबिनेट मंत्रीही राहिलेले आहेत. मात्र, त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कमलेश सिंह यांनी २०१९ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी निवडणूक लढवत राजकीय पुनरागमन केले.

भाजपात कधी प्रवेश करणार?

आमदार कमलेश कुमार सिंह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतल्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे आता ते भाजपात कधी प्रवेश करणार? यासंदर्भातील माहिती समोर आली असून ३ ऑक्टोबर रोजी कमलेश कुमार सिंह भाजपात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत.