Ajit Pawar Angry On Portfolio Question: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यानंतर मंत्र्यांना खातेवाटप न केल्याने विरोधक सतत महायुती सरकारवर टीका करत होते. अशात काल मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.
यानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, विधानसभेचे आमदार राजेश विटेकर आणि प्रताप पाटील चिखलीकर असल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार ठाण्यातील एका कार्यक्रमाला आले असता, त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले.
गप्प बसा ना बाबा…
अजित पवार काल रात्री ठाण्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. ते गाडीतून उतरताच त्यांना कार्यकर्ते आणि पत्रकारांनी गराडा घातला. यावेळी पत्रकारांनी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाल्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार संतापल्याचे पहायला मिळाले. या प्रश्नाला उत्तर देताना, “अरे गप्प बासा ना बाबा “, असे म्हटल्याचे ऐकू येत आहे. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर आमदार अमोल मिटकरी, आमदार राजेश विटेकर आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकरदेखील उपस्थित होते.
हे ही वाचा : भरत गोगावले यांचा रायगडच्या पालकमंत्रिपदावरचा दावा कायम, आदिती तटकरेंशी पुन्हा संघर्ष?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवड्याने खातेपाटप
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुमारे दोन आठवडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारानंतर आठवड्याने मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. काल (२१ डिसेंबर) नव्या मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे.
हे ही वाचा : मुंबई गोवा महामार्गावर धावत्या बसला आग, सुदैवाने सर्व ३४ प्रवासी बचावले
खरे तर महायुतीत गृहखात्यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र, गृहखाते सोडण्यास भाजपाने नकार दिला होता. अखेर गृहखाते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे. तर अजित पवार यांनाही पूर्वीप्रमाणे अर्थ खाते मिळाले आहे.