नवी दिल्ली : शपथविधी होऊन बारा दिवस उलटले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर सहमती न झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी अखेर दिल्ली गाठली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन खातेवाटपाबाबत चर्चा केली. हा पेच एक-दोन दिवसांत सुटण्याचे संकेत प्रफुल पटेल यांनी दिल्याने खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्गही मोकळा होणार आहे.
अजित पवार हे प्रफुल पटेल आणि हसन मुश्रीफ यांच्यासह बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे मुंबईतच होते. राज्यात तीन पक्षांचे सरकार असतानाही शिंदे आणि फडणवीस यांच्याशिवाय अजित पवार यांनी शहांची भेट घेतली. एरवी राज्यातील कुठल्याही प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस एकत्रपणे शहांची भेट घेत असत. मात्र, अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्याविना शहांशी सुमारे एक तास चर्चा केली.
अजित पवार यांच्या गटाने अर्थ, महसूल, जलसंपदा आणि सहकार या चार खात्यांची मागणी केली आहे. पण, सध्या अर्थ आणि जलसंपदा ही खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, महसूल खाते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. ही अत्यंत महत्त्वाची खाती भाजपकडून काढून घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी लागणार आहेत. शिवाय, शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रालयांवरही मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांनी दावा सांगितल्यामुळे खातेवाटपाचा पेच सोडवणे राज्यातील नेत्यांसाठी कठीण बनले. अजित पवार यांनी शहांची भेट घेतल्यामुळे हा गुंता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ खाते दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते.
अजित पवार दिल्लीत आल्यानंतर प्रफुल पटेल यांच्या रकाबगंज गुरुद्वारा भागातील निवासस्थानी गेले. तिथून पटेल यांच्यासह अजित पवार केंद्रीय मंत्री अमित शहांच्या ६ अ कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी दाखल झाले. मुंबईहून या दोघांबरोबर हसन मुश्रीफही दिल्लीला आले होते. मात्र, ते अमित शहांना भेटण्यासाठी गेले नाहीत. मुश्रीफ वैयक्तिक कामासाठी दिल्लीला आल्याचे सांगण्यात आले. मुश्रीफ यांच्याविरोधात सहकारी क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांमध्ये मुश्रीफ यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि मंत्रीपदाच्या शपथविधिनंतर अजित पवार पहिल्यांदाच दिल्लीला आले होते. राजशिष्टाचाराचा भाग म्हणून आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेत असल्याचे प्रफुल पटेल यांनी बैठकीआधी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खातेवाटपासंदर्भात कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही. एक-दोन दिवसांमध्ये खातेवाटप केले जाईल, असेही पटेल म्हणाले. मुंबईहून अजित पवार दिल्लीला रवाना झाल्यावर या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवापर्यंत खातेवाटपाचा तिढा सुटेल, अशी ग्वाही दिली. अमित शहांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल पटेल कोणतीही प्रतिक्रिया न देता रवाना झाले.
प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद?
केंद्रीय मंत्रिमंडळाचाही लवकरच विस्तार होणार आहे. त्यात अजित पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून प्रफुल पटेल यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असून, यासंदर्भातही शहांशी चर्चा झाल्याचे समजते.