नवी दिल्ली : महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा विखारी राजकारणाने लयाला जाऊ लागल्याची भीती व्यक्त होत असताना गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही परंपरा खंडित होणार नाही याची खात्री दिली! राजकीय मतभेद कायम असले तरी अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी जाऊन शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांना भेटणारे अजित पवार ‘६ जनपथ’ या पवारांच्या निवासस्थानी सुमारे अर्धा तास होते.
‘यशवंतराव चव्हाणांची सुसंस्कृतपणाची शिकवण महाराष्ट्र विसरलेला नाही’, अशी भावना अजित पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांकडे व्यक्त केली. ‘पवार कुटुंबातील सगळेच दरवर्षी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटतो. यावर्षी मी दिल्लीत असल्यामुळे त्यांना भेटायला आलो’, असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांबरोबर त्यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, पुत्र पार्थ पवार यांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. ‘आमचे राजकारण वेगळे झाले असेल, पण शरद पवारांबरोबर मी ३० वर्षे राजकारण केले आहे. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध अजूनही आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही १२ डिसेंबरला दरवर्षी त्यांना भेटतो. त्यामुळे यावर्षीही भेटलो, त्यांच्या भेटीची परंपरा कायम ठेवली’, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
सौहार्दपूर्ण संबंधांच्या वारशाची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे सर्वेसर्वा व ‘इंडिया’ आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा गुरुवारी ८४ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त दिल्लीतील निवासस्थानी सकाळपासून कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार बुधवारी संध्याकाळी दिल्लीत आले होते. राज्यातील राजकारणावर दिल्लीत खल सुरू असतानाही, राजकारणापलीकडे राजकीय नेत्यांचे एकमेकांशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांचा वारसा अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेऊन कायम राखला, याची चर्चा दिल्लीत रंगली.