रविवारी दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी ऐक्याची हाक दिली. मात्र या अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाराजी नाट्य चर्चेत राहिलं. विनंती करूनही अजित पवार भाषण न करताच व्यासपीठावरून निघून गेल्याने अधिवेशनातील गोंधळात अधिक भर पडल्याचं पहायला मिळालं. मात्र आता यासंदर्भात अजित पवार यांनीच प्रसारमाध्यमांशी बोलताना भाषण का केलं नाही याबद्दलचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घडलं काय?
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर शरद पवारांच्या भाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. पवारांनी या अधिवेशनाची दिशा निश्चित केली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, पी. सी. चाको, फौजिया खान यांची भाषणे झाली. या नेत्यांच्या भाषणानंतर पवार समारोपाचे भाषण करतील असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. पण, हे अधिवेशन राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केल्यामुळे युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनाही बोलण्याची संधी दिली गेली. त्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे यांचे दमदार भाषण झाले. कोल्हेंच्या भाषणानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाषणाची संधी दिली नसल्याचे लक्षात येताच, पटेल यांनी पाटील यांना भाषणाचा आग्रह केला. नाइलाजाने जयंत पाटील भाषण केले. ‘माझ्या आधी कोल्हे यांनी इतके जबरदस्त भाषण केले की मला आता बोलण्याजोगे काही उरलेले नाही’, असे म्हणत पाटील यांनी दहा मिनिटे भाषण केले.

सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं कौतुक
‘जयंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवार बोलतील’, अशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. वास्तविक, सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांचे कौतुक केल्यानंतर अजित पवारांना टाळ्यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला होता. माजी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आर्थिक व्यवस्थापनाचे चोख काम पार पाडले असल्याचे महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटले असल्याचे सुळे सांगितले. या सगळ्या नेत्यांची भाषणे होईपर्यंत अजित पवार व्यासपीठावर बसून होते.

…अन् अजित पवार निघून गेले
सभागृहातून अजित पवार यांनी भाषण करण्याची मागणी होऊ लागली. तोपर्यंत जयंत पाटील यांचे भाषण सुरू झाले. कार्यकर्त्यांकडून भाषणाची विनंती होऊ लागल्यानंतर अजित पवार व्यासपीठावरून खाली निघून गेले. प्रफुल्ल पटेल यांनी, जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्याआधी, ‘अजित पवारही खास आग्रहाखातर भाषण करतील’, असे कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. पण, अजित पवार निघून गेले. त्यावर, ‘अजितदादा आत्तापर्यंत इथे होते, तुम्ही आग्रह केल्यामुळे ते निघून गेले. ते वॉशरूमला गेले आहेत, ते परत येईपर्यंत आपण वाट पाहू’, असे पटेल म्हणाले. पण, अजित पवार परत आले नाहीत. अखेर अजित पवारांची वाट पाहून शरद पवार यांनी समारोपाचे भाषण केले. शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार भाषण न करता व्यासपीठावरून खाली उतरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

भाषण न केल्यासंदर्भात विचारलं असता अजित पवार म्हणाले…
अजित पवार यांना या अधिवेशनानंतर पत्रकारांनी भाषण न केल्यासंदर्भात विचारलं. तुम्ही या कार्यक्रमात भाषण न केल्याचा मुद्दा चर्चेत आहे असा संदर्भ देत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर अजित पवार यांनी हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होता त्यामुळे आपण भाषण केलं नाही असं उत्तर दिलं. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी, “मी भाषण केलं नाही ही वस्तूस्थिती खरी आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन होतं. वेगवगेळ्या लोकांनी आपआपली मतं मांडली,” असं म्हटलं. ‘मी महाराष्ट्रातील नेता असून राज्यात जाऊन मी बोलेन’, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले…
अजित पवारांनी जयंत पाटील यांचं भाषण सुरु असताना मंचावरुन निघून जाण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांनाही पत्रकारांनी अधिवेशानंतर प्रश्न विचारला. तुमचं भाषण सुरू असताना अजित पवार दोन वेळा उठून सभागृहातून बाहेर आले, ते तुमच्यावर नाराज आहेत का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “असं आहे की, कुणी लघुशंकेला गेलं तर त्याचीही बातमी करणं योग्य नाही. माझ्यानंतर शरद पवार यांचं भाषणं होतं. सर्वजण त्यांच्याच भाषणाची वाट पाहत होते. त्यामुळे शरद पवारांच्या भाषणाला उपस्थित राहता यावं, म्हणून माझं भाषण सुरू असताना अजित पवार लघूशंकेला जाऊन आले. अजित पवार माझ्यावर अजिबात नाराज नाहीत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar walks out of ncp national convention gives answer on why he have not given speech scsg
Show comments