‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्राप्तिकर विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली असून दोघांनी १०० कोटी रुपये भरावेत, असे या नोटीशीत म्हटले आहे. राहुल गांधी यांचे २०११- १२ मधील उत्पन्न १५५. ४१ कोटी रुपये तर याच कालावधीतील सोनिया गांधी यांचे उत्पन्न १५४. ९६ कोटी रुपये इतके होते.
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्या २०११-१२ या वर्षांतील प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाने डिसेंबरमध्ये परवानगी दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर प्राप्तिकर विभागाने दोघांच्या प्राप्तिकराचे पुनर्मूल्यांकन केले आहे. राहुल गांधी यांचे २०११- १२ मधील उत्पन्न १५५. ४१ कोटी रुपये तर सोनिया गांधींचे उत्पन्न १५४. ९६ कोटी रुपये असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतून उघड झाले आहे. तर काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे याच कालावधीत उत्पन्न ४८. ९३ कोटी रुपये इतके आहे. राहुल आणि सोनिया यांनी ३०० कोटींचे उत्पन्न लपवले असून यासाठी त्यांनी १०० कोटी रुपये भरण्याची नोटीस प्राप्तिकर विभागाने पाठवली आहे. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी दोघांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
यंग इंडिया कंपनी ५० लाख रुपयांच्या भांडवलावर स्थापन झाली होती. या कंपनीत राहुल आणि सोनिया गांधी यांची प्रत्येक ३८ टक्के मालकी असून उर्वरित मालकी ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा यांची आहे. २०११ मध्ये काँग्रेसने ९० कोटींचे कर्ज असोसिएटेड जर्नलला दिले होते. त्यानंतर यंग इंडियाने असोसिएटेड जर्नलला ताब्यात घेतले. मग काँग्रेसने ९० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. यातून राहुल आणि सोनिया यांनी नफा कमावल्याचा आरोप आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नलने २०१०- ११ मध्ये कोणतेही धर्मादाय काम केलेले नसल्याने या कंपनीला करसवलत मिळू शकत नाही, असा देखील दावा करण्यात आला होता.