भारताच्या हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राची ओडिशा येथील चाचणी क्षेत्रामध्ये उपयोजित चाचणी घेतली, ती यशस्वी झाली आहे. पाकिस्ताननेही काही क्षेपणास्त्रांची अलीकडेच चाचणी घेतली असून त्यांचा पल्ला ९०० ते १५०० कि.मी. असून भारतातील अनेक शहरे त्यांच्या टप्प्यात येतात.
आकाश क्षेपणास्त्र अत्याधुनिक असून ते चंडीपूरच्या संकुल क्रमांक तीन या एकात्मिक चाचणी क्षेत्रातून दुपारी ३.१८ वाजता सोडण्यात आले, अशी माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे एकात्मिक चाचणी क्षेत्राचे संचालक एम.व्ही.के.व्ही. प्रसाद यांनी सांगितले. या क्षेपणास्त्राने लक्ष्य अचूक भेदले. या आठवडय़ात आकाश क्षेपणास्त्राच्या अशा आणखी चाचण्या घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले.
‘आकाश’ हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ते जमिनीवरून हवेत मारा करणारे विमानविरोधी क्षेपणास्त्र आहे. त्यात बॅटरी असून एका विशिष्ट प्रणालीच्या मदतीने हे क्षेपणास्त्र लक्ष्य शोधते. जेट विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे भेदण्याची त्याची क्षमता असून अनेक प्रगत देशांकडे असलेल्या क्षेपणास्त्रांशी आकाशची तुलना होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
आकाश क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केले आहे. त्याची एक आवृत्ती अगोदरच हवाईदलात सामील करण्यात आली असून पायदळासाठी वापरायचे आकाश क्षेपणास्त्र प्रत्यक्ष सामील करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे, असे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा