Marathi Sahitya Sammelan 2025 LIVE : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत पाहायला मिळाली. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नव्हे तर आदराने पाण्याचा ग्लास देखील भरून दिला. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात आधी शरद पवार यांनी भाषण केलं. भाषण केल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावरील आपल्या खुर्चीवर येऊन बसले. मात्र, शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केल्याचं पाहायला मिळालं. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली तेव्हा सभागृहातील उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्याचं पाहायला मिळालं.

तसेच शरद पवार भाषण करून आल्यानंतर आणि खुर्चीवर बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: बाटलीतील पाणी ग्लासात घेऊन शरद पवार यांना दिलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केलं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दोघांमधील मैत्री अनेकवेळा दिसून आली आहे. याचाच प्रत्येय आज दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला आहे.

“मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, मोदींचं मराठीत भाषण

मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. “मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचं भाषण झालं. तेव्हा मी म्हटलं की फारच छान, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिलं. मला पण गुजराती अवडायची असं त्या म्हणाल्या. देशाच्या आर्थिक राजधानीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Story img Loader