उत्तर प्रदेशच्या तीन मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री शिवकुमार बेरिया यांनी इटावा येथील एका जाहीर कार्यक्रमात सरकारी अधिकारी आणि पोलिसांमध्ये कसलीही धमक नाही. आपल्या परवानगीशिवाय ते खुर्चीवरही स्थानापन्न होऊ शकत नाहीत. तसे त्यांनी केल्यास त्यांना २४ तासांत कामवरून काढून टाकण्यात येईल, असा धमकीवजा इशाराच बेरिया यांनी सर्वासमक्ष दिला.
राज्याचे दुग्धविकासमंत्री राममूर्ती वर्मा यांनीही फतेपूर येथे वादग्रस्त वक्तव्ये केली. राज्यात कोठे ना कोठे अप्रिय, घटना घडतच राहणार आणि कोणीही सत्तेवर असले तरी त्यास रोखू शकणार नाही, असे वर्मा यांनी सांगितले. मथुरा येथे पर्यटनमंत्री ओमप्रकाश सिंग हेही पत्रकारांवर बरसले. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर पत्रकारांनी सिंग यांना विचारणा केली असता तुमच्या मनातच काहीशी खराबी निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेत काहीही गडबड नाही, असे उत्तर दिले.