उत्तर प्रदेश सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. या श्वेतपत्रिकेत ६ महिन्यात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने केलेली कामे आणि आधीच्या सरकारने न केलेली कामे यांचा लेखाजोखा मांडला आहे. या श्वेतपत्रिकेवर एक ट्विट करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादीचे नेते अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. श्वेतपत्रिका जारी केली मात्र योगी सरकारला जाहीरनाम्याचा सोयीस्करपणे विसर पडला असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

श्वेतपत्रिका हा फक्त एक देखावा आहे. उत्तर प्रदेश सरकारला निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्याला फक्त १ पैशाची मदत दिली जाते यापेक्षा मोठी थट्टा काय? अशा आशयाचा ट्विट अखिलेश यादव यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होण्याआधी भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. भाजपच्या जाहीरनाम्यातही या आश्वासनाचा उल्लेख होता. मात्र भाजपची सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना अवघी १ पैशाची कर्जमाफी मिळाली आहे, असा खोचक ट्विट करत अखिलेश यादव यांनी श्वेतपत्रिकेवर टीका केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश सरकारच्या काळात काय काय घडू शकले नाही याचा लेखाजोखा सोमावारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मांडला. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना सार्वजनिक क्षेत्रात ९१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. अखिलेश सरकार भ्रष्टाचार करणारे आणि बेजबाबदार होते, त्याचमुळे उत्तर प्रदेशचा विकास होऊ शकला नाही असेही त्यांनी म्हटले होते.

Story img Loader