राज्यात भाजपची हवा वाढली असल्याची कबुली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी शुक्रवारी दिली. मात्र असे असले तरी राज्यात भाजपचा प्रभाव वाढत असला तरी त्यामागे मोदीलाटेचा हात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशबाबत केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेत केवळ मोठय़ा मनाची व्यक्तीच देशाचा पंतप्रधान बनू शकते असे सांगत भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच उत्तर प्रदेशात मोदीलाट नसल्याचेही सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांत १०० हून अधिक दंगली झाल्या तर गुजरातमध्ये गेल्या १० वर्षांत एकही दंगलीची घटना घडली नसल्याच्या मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतना अखिलेश म्हणाले की, मोदी सरकारने गुजरातमध्ये जातीय हिंसाचाराला चालना दिली तर उत्तर प्रदेशमध्ये आपण अशा दंग्यांना थांबवण्याचे काम केले.
भाजपच्या मेळाव्यांपेक्षा समाजवादी पक्षाच्या मेळाव्यांना गर्दी असते. भाजपचे कार्यकर्ते मोकळ्या जागा सोडून मैदाने भरल्याचे दाखवतात तर सपाचे कार्यकर्ते मेळाव्यांना दाटीवाटीने बसतात.
भाजपच्या मेळाव्यांना काही प्रमाणात गर्दी होत असल्याचे मान्य असले तरी निकाल त्यांच्या बाजूने लागणे कठीण असल्याचे मतही अखिलेश यादव यांनी व्यक्त केले.
दरम्यान ,अखिलेश यांनी मोदीपाठोपाठ बसपच्या प्रमुख मायावती आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. उत्तर प्रदेशात आपचा प्रभाव नसल्याचे ते म्हणाले, तर मायावतींवर टीकेची झोड उठवताना ते म्हणाले की, मायावती या लोकांच्या पैशाचा स्वतच्या प्रचारासाठी वापर करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आपण मोठे दलित नेतृत्व असल्याचेही त्या भासवतात, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

Story img Loader