Akhilesh Yadav On Waqf Amendment Bill 2025: सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यामध्ये आज केंद्रिय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजेजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले असून, यावर आता सभागृहात चर्चा सुरू आहे. वक्फ विधेयक लोकसभेत सादर करण्यात आल्यानंतर, या विधेयकावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ देण्यात आला आहे परंतु सरकारने म्हटले आहे की जर सभागृह सहमत असेल तर चर्चेचा वेळ वाढवता येईल. सरकार आजच चर्चेला उत्तर देणार आहे.
महाकुंभमेळ्यातील मृतांची संख्या…
दरम्यान या विधेयकाच्या चर्चेत सहभागी होऊन सभागृहात बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी, “महाकुंभमेळ्यातील मृतांची संख्या लपविण्यासाठी वक्फ विधेयक आणले”, असे म्हटले आहे.
देशातील कोट्यवधी लोकांची घरे आणि दुकाने…
“वक्फ विधेयकामागील धोरण आणि हेतू चांगले नाहीत. भाजपा सरकार देशातील कोट्यवधी लोकांची घरे आणि दुकाने हिसकावून घेऊ इच्छिते. जेव्हा देशातील बहुतेक पक्ष याच्या विरोधात आहेत, तेव्हा त्यांना हे विधेयक का आणायचे आहे? वक्फ विधेयक भाजपाचे वॉटरलू ठरेल. भाजप मंत्र्यांनी कोणतीही आशा दाखवली नाही. हे एका विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग आहे. भाजप मुस्लिमांमध्येही फूट पाडू इच्छित आहे”, असे अखिलेश यादव यांनी सभागृहात बोलताना म्हटले.
अखिलेश यादव यांनी लोकसभेत भाषण करताना भाजपवर टीका केली आणि आरोप केला की, वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक सरकारच्या अपयशांवरून लक्ष हटवण्यासाठी आणण्यात आले आहे.
“हे विधेयक सुधारणांसाठी नाही तर या राजवटीच्या उणीवा आणि अपयशांवर पांघरूण घालण्यासाठी आणण्यात आले आहे,” असे अखिलेश यादव यांनी ठामपणे सांगितले. सत्ताधारी पक्ष कायद्यांचा राजकीय हत्यार म्हणून वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जगातील सर्वात मोठा पक्ष…
वक्फ विधेयकावर बोलताना अखिलेश यांनी भाजपाला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवरूनही लक्ष्य केले. ते म्हणाले,
“जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवणारा पक्ष अद्याप आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकलेला नाही.”
अमित शाह यांचे प्रत्युत्तर
दरम्यान अखिलेश यादव यांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “माझ्यासमोर असलेले सर्व पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष, फक्त काही कुटुंबातील सदस्यांमधून निवडले जातात. आम्हाला एका प्रक्रियेनंतर १२-१३ कोटी सदस्यांमधून निवड करावी लागते. म्हणून वेळ लागतो. तुमच्या बाबतीत बोलायचे झाल्याच तुम्हीच पुढील २५ वर्षे तुमच्या पक्षाचे अध्यक्ष राहाल.”