अखिलेश यादव यांच्याकडून तिसऱ्या आघाडीला पाठिंबा जाहीर

लखनऊ : भाजपला पर्याय देण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने जोरदार झटका दिला आहे. काँग्रेस व भाजपला पर्याय म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रस्तावित केलेल्या तिसऱ्या आघाडीला अखिलेश यांनी पाठिंबा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी स्थापन केल्याबद्दल हैदराबादला जाऊन आपण के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले. मध्य प्रदेशात सपचा एकमेव आमदार निवडून आला आहे. मात्र या आमदाराला मंत्री न बनवल्याने अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज आहेत. यामुळेच त्यांनी उत्तर प्रदेशात ताकद नसलेल्या काँग्रेसला बळ न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. ‘‘भाजपबरोबर काँग्रेसचेही खूप खूप आभार. मध्य प्रदेशात आमच्या एकमेव आमदाराला तुम्ही मंत्री केले नाही. त्यामुळे आमचा मार्ग आता मोकळा झालाा आहे,’’ अशी टीका अखिलेश यांनी काँग्रेसवर केली आहे, तर ‘‘समाजवाद्यांना मागासलेले समजल्याबद्दल भाजपचेही आभार,’’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अखिलेश यादव यांनी चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी स्थापन झाल्यास भाजपपेक्षाही काँग्रेसला तिचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात महाआघाडी स्थापन करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांना माझा पाठिंबा आहे. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. २०१९ मध्ये आघाडी निश्चित होईल.

-अखिलेश  यादव, नेते, समाजवादी पक्ष

Story img Loader