काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला तीन दिवसांपूर्वी मणिपूर येथून सुरुवात झाली आहे. ही यात्रा आता नागालँडमध्ये दाखल झाली आहे. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ही पदयात्रा महाराष्ट्राची राजधानी मुबईत येऊन थांबेल. तब्बल ६,७०० किमी लांब अशी ही पदयात्रा देशातल्या १५ राज्यांमधून जाईल. राहुल गांधी या यात्रेतला सर्वाधिक काळ उत्तर प्रदेशमध्ये घालवणार आहे. ६७ दिवसांच्या या यात्रेतले ११ ते १२ दिवस राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये असणार आहेत. राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये ११०० हून अधिक किलोमीटर अंतर चालणार आहेत. यांनी त्यांच्या सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव या यात्रेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यादव यांनी स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका बाजूला राहुल गांधींचा प्रयत्न आहे की, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा पक्ष मजबूत व्हावा. त्यासाठी ते उत्तर प्रदेशमध्ये ११ दिवसांत १,०७४ किमी प्रवास करणार आहेत आणि या काळात २० जिल्ह्यांना भेट देणार आहेत. दरम्यान, ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पक्षाला धक्का बसला आहे. कारण इंडिया आघाडीतला काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला समाजवादी पार्टी हा पक्ष या यात्रेत सहभागी होणार नाही असं दिसतंय.

अखिलेश यादव यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, आम्हाला ना भाजपा बोलावतेय, ना काँग्रेसवाले. यादव यांच्या या वक्तव्याने स्पष्ट केलं आहे की, काँग्रेसने अद्याप समाजवादी पार्टीला किंवा अखिलेश यादव यांना ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्याचं निमंत्रण दिलेलं नाही. दरम्यान, अखिलेश यादव यांनी निवडणुकीपूर्वी स्वतःची यात्रा काढण्यावर भाष्य केलं आहे. अखिलेश यादव यांचा पक्ष ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ (संविधान वाचवा, देश वाचवा) अशी पदयात्रा काढणार आहे. उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ही यात्रा निघणार आहे.

हे ही वाचा >> “अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा धर्मशास्त्राविरुद्ध”, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांचा आक्षेप, म्हणाले…

“आधी जागावाटप, त्यानंतर…”

राहुल गांधी यांच्या यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी यापूर्वीदेखील भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, “सध्या तरी ती केवळ काँग्रेसची यात्रा आहे. आम्हाला अपेक्षा आहे की इंडिया आघाडीत जितके विरोधी पक्ष आहेत, जसे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि इतर सगळेच पक्ष जे काँग्रेसशी युती करून भाजपाविरोधात लढणार आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की, राहुल गांधी यांच्या यात्रेआधी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप पूर्ण करायला हवं. आधी जागावाटप, त्यानंतर यात्रा आणि मग निवडणूक असा क्रम असायला हवा. तसं केल्यास आपण सगळेच जण भक्कमपणे भाजपाविरोधात लढू शकतो. राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप झालं तर अनेकजण या यात्रेत स्वतःहून सहभागी होतील, मदतीसाठी पुढे येतील. निवडणूक लढणार आहे तो प्रत्येक उमेदवार जगबाबदारीने तिथे उभा असेल.” परंतु, काँग्रेसने जागावाटपाचा निर्णय घेण्याआधीच ही यात्रा सुरू केली आहे. आता कदाचित पदयात्रा संपल्यानंतर जागावाटपावर अंतिम निर्णय होऊ शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav indirectly says sp wont join rahul gandhi bharat jodo nyay yatra asc