उत्तर प्रदेशमधील कडाक्याच्या थंडीत समाजवादी पक्षाचे ( सपा ) सर्वेसर्वा अखिलेश यादव चांगलेच आक्रमक दिसले. सपाच्या ट्वीटर समन्वयकाला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्यापार्श्वभूमीवर अखिलेख यादव पोलीस मुख्यालयात पोहचले होते. तेव्हा पोलिसांनी अखिलेश यादव यांना चहा पिण्याचं निमंत्रण दिलं. पण, अखिलेश यादव यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला.
अखिलेश यादव रविवारी सकाळी लखनऊ येथील पोलीस मुख्यालयात पोहचले होते. तेव्हा एकही पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसून आलं. काही वेळानंतर पोलीस अधिकारी आल्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांना चहाबाबत विचारणा केली. मात्र, अखिलेश यादव यांनी नकार दिला. अखिलेश यादव आणि पोलिसांच्या चर्चेतील हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओत पोलीस अखिलेश यादव यांना चहाची विचारणा करतात. त्यावर अखिलेश यादव म्हणाले, “तुम्ही नका, आम्ही मागवत आहोत. आम्ही येथील चहा नाही पिणार. आम्ही बाहेरून चहा आणू, तुमच्याकडून फक्त कप घेऊ. चहात विष टाकून दिलं तर. तुमच्यावर माझा विश्वास नाही. तुम्ही तुमचा चहा प्या, आम्ही आमचा पितो,” असं अखिलेश यादव यांनी पोलिसांना सांगितलं.
हेही वाचा : अंजलीची मैत्रिण निधीबाबत खळबळजनक माहिती समोर; तेलंगणात ‘या’ प्रकरणात झाली होती अटक
काय आहे प्रकरण?
भाजपा युवा मोर्चाच्या समाजमाध्यम समन्वयक ऋचा राजपूत यांनी सपाच्या ट्वीटर समन्वयक मनीष अग्रवाल याच्यावर बलात्कार आणि हत्येची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनीष अग्रवाल याला पोलिसांना अटक केली. मनीष अग्रवालच्या अटकेविरोधात अखिलेश यादव लखनऊ येथील पोलीस मुख्यालयात गेले होते.