एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारताच्या या दारूण पराभवाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. अंतिम सामन्यापूर्वी सर्वांनी भारतच विश्वविजेता होईल, असं वर्तवलं होतं. परंतु, ऑस्ट्रेलियन संघाने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत विश्वचषक उंचावला. याशिवाय ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले. दरम्यान, या सामन्यावेळी पहिल्या डावात फलंदाजी करणं जेवढं अवघड होतं तितकंच अवघड दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करणं अवघड होतं. त्यामुळे जगभरातून अहमदाबादच्या खेळपट्टीवरून बीसीसीआयवर टीका होत आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ही खेळपट्टी संथ असल्याने भारतीय फलंदाज जास्त धावा जमवू शकले नाहीत. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठीदेखील मोठं आव्हान होतं. परंतु, दव पडल्यानंतर गोलंदाज त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे भारताच्या पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडलं जातंय. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीतल्या सामन्यांसारखे महत्त्वाचे सामने हे मुंबईच्या वानखेडे किंवा कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवले जातात. परंतु, राजकीय हस्तक्षेपामुळे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवल्याचा आरोप देशभरातून होत आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील अंतिम सामना अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यावरून आयोजकांवर टीका केली आहे. अखिलेश यादव म्हणाले, विश्वचषक स्पर्धेतला अंतिम सामना गुजरातमध्ये खेळवण्यात आला. हा सामना जर लखनौमध्ये खेळवला असता तर टीम इंडियाला अनेकांचा आशीर्वाद मिळाला असता. लखनौच्या स्टेडियमला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे भारताला देवाचा आणि वाजपेयींचादेखील आशीर्वाद मिळाला असता. तसेच भारत जिंकला असता.

हे ही वाचा >> World Cup 2023: आयसीसीकडून विश्वचषकात सर्वोतम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची यादी जाहीर, ‘या’ टीमने मारली बाजी

अखिलेश यादव म्हणाले, मला असं ऐकायला मिळालं आहे की अहमदाबादची खेळपट्टीदेखील खराब होती. तसेच लोकांची तयारी अपूर्ण होती. कधी कधी काळ सांगतो की, आता त्यांची (भाजपा) वेळ राहिली नाही. आता दुसऱ्यांची वेळ आली आहे.