अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढले आहे. मागच्या महिन्यात २० जानेवारी रोजी १८ वर्षीय अकुल धवनचा मृतदेह इलिनॉय विद्यापीठाच्या संकुलात आढळून आला होता. अकुलच्या मृत्यूचे कारण आता समोर आले आहे. इलिनॉय मधील शॅम्पेन काउंटी कोरोनर कार्यालयाने अकुलच्या मृत्यूचा खुलासा केला आहे. अकुल मद्याच्या अमलाखाली होता, अशात त्याला एका नाईट क्लबच्या बाहेर कडाक्याच्या थंडीत बराच वेळ राहावे लागले, ज्यामुळे थंडीत गोठून त्याचा मृत्यू झाला. अकुलचा मृतदेह आढळून आल्यानंतर हायपोथर्मियामुळे (शरिराचे तापमान कमी होणे) त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांना आला होता. त्यासाठी आता सबळ पुरावा समोर आला आहे.
अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत?
नाईट क्लबमध्ये घेतलं नाही
१९ जानेवारीच्या रात्री अकुल आपल्या मित्रांसमवेत मद्य पिण्यासाठी बाहेर गेला होता. विद्यापीठाच्या जवळच असलेल्या कॅनॉपी क्लबमध्ये अकुलचे सर्व मित्र गेले. मात्र अकुलला काही कारणास्तव क्लबमध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्याने अनेकवेळा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याला आत घेतले नाही. अकुलचे मित्र काही वेळानंतर क्लबच्या बाहेर आले, तेव्हा त्यांना अकुल दिसला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तो कॉललाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी मध्यरात्री पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मध्यरात्री अकुलचा शोध घेतला. पण तरीही तो आढळून आला नाही.
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे सत्र थांबेना; एकाच आठवड्यात तीन मृत्यू
दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या संकुलात अकुलचा मृतदेह आढळून आला. कॅनॉय क्लबपासून केवळ सव्वाशे मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळल्यामुळे अकुलच्या पालकांनीही नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप अकुलच्या पालकांनी केला आहे. तसेच अकुलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असण्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता एका महिन्यानंतर त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे.
इलिनॉय विद्यापीठाचा परिसर हा अतिथंडीसाठी ओळखला जातो. जानेवारी महिन्यात या भागात उणे २० ते ३० अंश सेल्सियस इतके तापमान असते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती रात्रीच्या वेळेस अधिक काळ बाहेर राहिल्यास त्याचा हायपोथर्मियामुळे मृत्यू होण्याचा संभव असतो.