नवीन दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान व मध्य पूर्वेत यापुढे अतिरेक्यांची सुरक्षित आश्रयस्थाने निर्माण होतील, असा धोक्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्टेट ऑफ युनियनच्या अखेरच्या भाषणात दिला आहे. अमेरिका व मित्र देशांना अल कायदा व आयसिसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
अल कायदा व आयसिस या दोन्ही संघटना जगाला घातक आहेत कारण दहशतवादाच्या या संकुचित जगात मानवी जीवनाची अजिबात किंमत नसते, ते मोठी हानी करू शकतात.
अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे आयसिस व अल कायदावर केंद्रित असले पाहिजे पण तेथेच थांबून चालणार नाही, आयसिसशिवायही मध्य पूर्व, अफगाणिस्तान व पाकिस्तान, मध्य अमेरिका, आफ्रिका, आशिया या भागात अस्थिरता येती काही वर्षे कायम राहणार आहे.
यातील काही ठिकाणे ही नवीन दहशतवादी संघटनांची सुरक्षित आश्रयस्थाने असतील. पुढील जानेवारीत ओबामा यांची अध्यक्षपदाची कारकीर्द संपुष्टात येत आहे. अमेरिकेने हे प्रश्न सोडवावेत यासाठी जग आशेने बघत आहे व आपली त्यावरील उत्तरे कडक संवादापेक्षा वेगळी असली पाहिजेत. दहशवादाविरोधातील लढाईत रिपब्लिकनांनी सहकार्य करावे. अमेरिकी काँग्रेसला दहशतवादाविरोधातील लढाई जिंकायची असेल, तर आयसिस विरोधात लष्करी बळाचा वापर केला पाहिजे. काँग्रेसने तसे केले नाही तरी शेवटी जर आयसिस अमेरिकेच्या मागे लागली, तर आम्ही त्यांचा पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही. त्याला वेळ लागेल पण आमच्या क्षमता मोठय़ा आहेत.