पाकिस्तानच्या आदिवासी पट्टय़ात अल कायदा अद्याप सक्रिय आहे, असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर असलेले जनरल लॉइड जे. ऑस्टिन यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सशस्त्र दल समितीसमोर केला आहे.
काश्मीर प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावही कायम असून त्यामुळे विभागीय स्थैर्याला धोका पोहोचत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानच्या प्रांतिक प्रशासन असलेल्या आदिवासी पट्टय़ात (एफएटीए) तसेच अफगाणिस्तानच्या पूर्व भागांत तुरळक प्रमाणात अल कायदाच्या कारवाया सुरू आहेत. या दोन्ही भागांत अल कायदाचा बीमोड करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामुळे जेथे त्यांच्यावर नियंत्रण येऊ शकणार नाही, अशा आणखी दुर्गम भागांत अल कायदा तळ ठोकण्याची शक्यता आहे, असेही जन. ऑस्टिन यांनी सांगितले.
पाकिस्तान सरकार दहशतवादाचा मुकाबला करू पाहात आहे आणि अमेरिका त्यांना त्यासाठी आवश्यक ते पाठबळ देत आहे. तरीही पाकिस्तानात अमेरिकेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ढासळलेली अर्थव्यवस्था आणि दिशाहीन युवाशक्ती, हे पाकिस्तानसमोरचे मुख्य आव्हान आहे. त्यामुळे धर्माधता वाढत असून देशाच्या विविध भागांत दहशतवादी संघटनांना आणि घातपाती कारवायांना पाठबळ मिळत आहे. देशात वाढत असलेले दहशतवादी हल्ले आणि वांशिक हिंसाचार याला पाकिस्तान तोंड देत असतानाच शेजारील देशाबरोबरचे त्यांचे संबंधही ताणले जात आहेत, असेही ते म्हणाले.

Story img Loader