‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचा नेता अयमन अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचं मानलं जात असतानाच अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अल-कायदा’ने जारी केलेल्या व्हिडीओत जवाहिरी दिसून आला आहे. जवाहिरीचा हा व्हिडीओ अमेरिकेला धक्का देणार असल्याचं म्हटलं आहे, कारण मागील बऱ्याच महिन्यांपासून जवाहिरीचा मृत्य झाल्याचा दावा केला जात होता. अमेरिकेतील एसआयटीई या गुप्तचर गटाकडून या जिहादी गटाच्या ऑनलाइन हलचालींवर लक्ष ठेवलं जातं. याच गटाच्या तपासामध्ये जवाहिरीने अनेक मुद्द्यांचा उल्लेख असणारं भाषण केल्याचं म्हटलं आहे. यामध्ये रशियन लष्करी तळाचाही उल्लेख जावहिरीने केलाय. एसआयटीईच्या निर्देश असणाऱ्या रिटा कॅट्झ यांनी दिलेल्या माहितीनुसार जवाहिरीने तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचा उल्लेख भाषणात केला नसल्याचं लक्षात आणून दिलं आहे. जवाहिरीचा मृत्यू मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये झाल्याचं म्हटलं जात होता. यापूर्वी तो मागील वर्षी अशाच एका व्हिडीओमध्ये दिसला होता. ९/११ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अल-कायदा’ने जारी केलेल्या व्हिडीओत तो दिसला होता.
याच वर्षी जून महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांच्या अहवालामध्ये ‘अल कायदा’च्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा भागाजवळीच हलचालींमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं होतं. तसेच या ठिकाणी या दहशतवादी संघटनेचे प्रमुख नेते असल्याचंही सांगितलं होतं. यामध्ये जवाहिरीचाही समावेश आहे. मात्र जवाहिरी जिंवत आहे की नाही याबद्दल शंका असतानाच त्याचं वय पाहता तो आता असल्या व्हिडीओमध्ये दिसण्याची शक्यता धूसर असल्याचं म्हटलं होतं. तो जिंवत असेल पण तो व्हिडीओमध्ये येण्याइतपत त्यांची प्रकृती आणि क्षमता असेल याबद्दल साशंकता आहे असं अहवालात म्हटलं होतं. जवाहिरी हा १९९८ पासून ‘अल-कायदा’साठी काम करतोय
19) However, Zawahiri doesn’t mention Taliban’s Afghanistan victory, and his talk of US “making its exit from Afghanistan” could have been said early as Feb 2020 upon Doha Agreement. Thus, he could still be dead, though if so, would have been at some point in or after Jan 2021
— Rita Katz (@Rita_Katz) September 11, 2021
“मरणाच्या बातम्या समोर येत असतानाच ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचा नेता अयमन अल जवाहिरीचा ६० मिनिटांचा व्हिडीओ समोर आला आहे. जवाहिरीचा मृत्यू झालेला नाही हे या व्हिडीओवरुन स्पष्ट होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्याने त्याच्या मृत्यूच्या बातम्या पसरल्यानंतर डिसेंबरमध्ये घडलेल्या घडामोडींचा उल्लेख केला आहे.” असं कॅट्झ यांनी म्हटलं आहे. या दहशतवाद्याने जानेवारीमध्ये अलकायदाच्या सहकारी गटाने रशियन लष्कर तळावर ताबा मिळवल्याचा उल्लेखही व्हिडीओत केलाय. त्यामुळे तो नोव्हेंबरमध्ये मरण पावल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
११ सप्टेंबर २०२१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यानंतर मूळचा इजिप्तचा असणाऱ्या जवाहिरीने ओसामा बीन लादेनच्या मृत्यूनंतर अलकायदाचे नेतृत्व केलं होतं. नुकत्याच जारी केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने अमेरिकन लष्कराने माघार घेतल्याचा उल्लेख केला असला तरी तो फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या दोहा कराराशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जवाहिरीने तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यासंदर्भातील कोणतंही वक्तव्य या व्हिडीओत केलेलं नाही. त्यामुळे जवाहिरीचा हा व्हिडीओ आधीच शूट करुन ठेवण्यात आला असेल आणि आता त्याचा मृत्यू झाला असेल अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र सध्या जवाहिरी जिवंत आहे की मरण पावलाय याबद्दल कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
११ सप्टेंबर २००१ म्हणजेच २० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली ‘अल-कायदा’ने अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन मोठ्या इमारती त्यांनी उद्धवस्त केलेल्या. त्यानंतरच अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं. अमेरिकने त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर घडवून आलं होतं. हा संघर्ष २० वर्षे चालला अखेर अमेरिकने मागील आठवड्यामध्ये आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेत असल्याची घोषणा केलीय.