एकेकाळी जगभरात दहशतीचे थैमान घालणारी अल कायदा ही दहशतवादी संघटना इसिसमुळे अस्तित्वाची लढाई लढत आहे. अल कायदाचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याच्या मवाळ भूमिकेमुळे कट्टर जिहादी इसिसकडे आकर्षित होत आहेत. याचा परिणाम दहशतवाद्यांची नवीन भरती व निधीवर झाला असून याची चिंता अल कायदाला सतावत आहे.
याबाबतचा अहवाल लंडनमधील प्रसिद्ध वृत्तपत्राने प्रसिद्ध केला असून यात इसिस या जहाल दहशतवादी संघटनेचा उदय झाल्यामुळे अल कायदा मागे पडली. याला त्या दोन्ही संघटनांना लाभलेले नेतृत्व कारणीभूत असल्याचे या लेखात म्हटले आहे. यासाठी या वृत्तपत्राने जवाहिरीचा जवळचा मित्र अबु मुहम्मद अल-मक्दीसी याचा हवाला दिला आहे.
अल कायदाचा सर्वेसर्वा लादेन ठार झाल्यानंतर जवाहिरीला प्रमुख बनविण्यात आले. मात्र जवाहिरीने मवाळ भूमिका घेत कारवाया थांबविल्याने अल कायदाकडे येणारा पैसा व जिहादी वर्ग इसिसकडे आकर्षित झाला. यामुळे अल कायदाचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. जवाहिरी एकटाच संघटनेची सूत्रे सांभाळतो. संघटनेमध्ये आता कमांडर किंवा इतरांसारखी यंत्रणाच राहिली नसल्याचे अबु याने यात म्हटले आहे.
इसिस हा अल कायदापासून वेगळा झालेला गट असून त्याने आता इराक व सीरियाच्या शेकडो मैल भूभागावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अल कायदाने या गटापासून दूर राहणेच पसंत केले आहे. याचा परिणाम संघटनेच्या आक्रमकतेवर झाल्याचे आणखी एक मूळचा जॉर्डियन असलेला व पुरोगामी विचारांकडे वळलेला अबु कातादा याने सांगितले आहे.
आर्थिक परिस्थिती खालावली
पूर्वी अल कायदासाठी काम करणारे दहशतवादी व कमांडर आता इसिससाठी लढत आहेत. तसेच अल कायदाला येणारा हजारो डॉलर्सचा निधी आता कमी होत चालला आहे. हा पैसा इसिसकडे वळता झाला आहे. अल कायदाची आर्थिक स्थिती खालावल्याने पाकिस्तानमधील वझरिस्तानमध्ये त्यांचा एक कमांडर खाण्यासाठी कार व लॅपटॉप विकताना आढळला होता. यावरून अल कायदा अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे या लेखात म्हटले आहे.
इसिसमुळे अल कायदासमोर अस्तित्वाची लढाई
एकेकाळी जगभरात दहशतीचे थैमान घालणारी अल कायदा ही दहशतवादी संघटना इसिसमुळे अस्तित्वाची लढाई लढत आहे.
First published on: 12-06-2015 at 11:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Al qaeda vs isis