अमेरिकेतल्या एका विमानतळावरून विमानाने हवेत उड्डाण केल्यानंतर विमानाचा दरवाजा उडून गेल्याची घटना समोर आली आहे. अलास्का एअरलाईन्सच्या बोइंग ७३७-९ मॅक्स विमानाने पोर्टलँड विमातळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळात हे विमान १५ हजार फूटांहून अधिक उंच गेलं. हवेत असताना या विमानाचा दरवाजा उडून गेला. त्यामुळे विमानातील प्रवासी घाबरले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, सेंट्रल केबिनचा एक्झिट डोर विमानापासून पूर्णपणे निखळून उडून गेला आहे. दरवाजा उडून गेल्यानंतर विमानातले प्रवासी घाबरले होते. या व्हिडीओत प्रवासी घाबरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच प्रवाशांचा गोंधळ ऐकायला मिळत आहे. विमानाचा दरवाजा उडून गेल्यानंतर काही प्रवासी त्यांची खुर्ची घट्ट पकडून बसले होते तर काहीजण गोंधळ करत आहेत.
अलास्का एअरलाईन्सने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये अलास्का एअरलाईन्सने म्हटलं आहे की, पोर्टलँडहून ओन्टारियो आणि कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या एएस-१२८२ विमानाला शुक्रवारी सायंकाळी एका दुर्घटनेचा सामना करावा लागला आहे. या विमानात १७१ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. दुर्घटनेनंतर काही वेळात हे विमान पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. ही दुर्घटना कशामुळे घडली याचा आम्ही तपास करत आहोत. तपासाअंती समोर येणारी माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (एनटीएसबी) एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ते अलास्का एअलाईन्सच्या विमानाशी संबंधित दुर्घटनेचा तपास करत आहेत. विमान १६,३२५ फूट ही उंची गाठण्याआधी काही वेळ ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवर उतरवण्यात आलं. विमानातली सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
हे ही वाचा >> पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोगिंदर शर्मावर एफआयआर दाखल; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण
Flightradar24 ने या घटनेची माहिती देताना सांगितलं की, विमानाचं हे मॉडेल फार जुनं नाही. या विमानाने आतापर्यंत केवळ १४५ उड्डाणे केली आहेत. ७३७-९ बोइंग विमानात पंख्यांच्या मागे एक रियर केबिन एग्जिट डोर असतो. या दरवाजाजवळ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. अलास्का एअलाईन्सच्या विमानांमधील दरवाजे अॅक्टिव्हेटेड नसतात. यामध्ये दरवाजाजवळ प्लग असतात.