काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सिनेमात दाखवलेल्या काही घटनांमुळे स्थानिक राजपुतांच्या भावना दुखावल्याचा दावा करत करणी सेना नावाच्या संघटनेनं मोठा धुडगूस घातला. त्यामुळे आधी ‘पद्मावती’ असलेलं सिनेमाचं नाव बदलून फक्त ‘पद्मावत’ असं करण्यात आलं. पण आता पुन्हा एकदा अलाउद्दीन खिलजी, राणी पद्मावती आणि आरशाशी संबंधित ‘त्या’ प्रसंगावरून वाद सुरू झाला आहे. भाजपाचे स्थानिक खासदार सी. पी. जोशी यांनी चित्तोडगड किल्ल्यातील लेझर शो बंद पाडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमका वाद काय?

१३व्या शतकामध्ये राजपुतानावर आक्रमण करण्याच्या तयारीत असलेला दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी मेवाडमध्ये राजा रतन सिंह यांना भेटण्यासाठी आल्याची इतिहासात नोंद आहे. मात्र, यावेळी रतन सिंह यांच्या पत्नी राणी पद्मावती यांच्या सौंदर्याच्या चर्चा ऐकून त्यांना पाहाण्याची इच्छा खिलजीनं बोलून दाखवल्याची दंतकथा प्रचलित आहे. यावेळी रतन सिंह यांनी एका आरशामध्ये राणी पत्मावतीला पाहाण्याची मुभा खिलजीला दिल्याचं देखील या कथेमध्ये सांगितलं जातं.

मात्र, याच मुद्द्यावर काही राजपूत संघटना आणि भाजपानं देखील तीव्र आक्षेप घेतला आहे. इतिहासात अशी कोणतीही नोंद नसून अशा कोणत्याही आरशाचा उल्लेख नसल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. तसेच, या दाव्याच्या आधारे मेवाडच्या किल्ल्यामधील आरसा आणि या प्रसंगाविषयी भाष्य करणारी चित्र देखील काढून टाकण्यात आली आहेत.

Padmavati खरंच ‘पद्मावती’ होती का?

नवा वाद कशावरून झाला?

संजय लीला भन्साळींच्या पद्मावत सिनेमानंतर आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. चित्तोडगड किल्ल्यामध्ये स्थानिक प्रशासनामार्फत राजा रतनसिंह आणि राणी पद्मावती यांच्या आयुष्याचं कथानक सांगणारा लेझर शो सुरू करण्यात आला होता. मात्र, या शोमध्ये हा आरशाचा प्रसंग समाविष्ट करण्यात आल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला.

स्थानिक भाजपा खासदार सी. पी. जोशी आणि त्यांच्या काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी हा शो बंद पाडून त्यातून संबंधित आरशाचा संदर्भ काढून टाकण्यास बजावले. यावर जिल्हा प्रशासनाने लेझर शोमधील आक्षेप असलेला भाग काढून टाकला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alauddin khilji rani padmavati chittorgarh fort lazer show halted bjp mp c p joshi pmw