ओण्टारिओतील एका छोटय़ा खेडय़ात जन्मलेल्या अ‍ॅलीस मन्रो यांच्या ग्रामीण कथा या त्यांचे अनुभव आणि मानवाच्या स्थितीच्या व्यथेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या आहेत. गेल्या चार दशकांत त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले असूनही त्या जितक्या अलिप्त राहिल्या होत्या तितकीच त्यांच्या लघुकथा आणि कादंबरीतील पात्रेही अलिप्त होती.
अ‍ॅलीस मन्रो उच्चभ्रू वर्गात फारशा मिसळत नव्हत्या, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांचे दर्शन तसे दुर्मीळच होते. त्याचप्रमाणे त्या पुस्तकसफरीवरही जात नसत, असे अमेरिकेतील टीकाकार डेव्हिड होमेल यांनी म्हटले आहे. मन्रो या अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेच्या होत्या, काही वेळा कॅनडातील दुसऱ्या साहित्यिक मार्गारेट अ‍ॅटवूड यांच्या बरोबर विरुद्ध मन्रो आहेत, अशी त्यांची तुलना केली जात असे.
मन्रो यांचा जन्म १० जुलै १९३१ रोजी ओण्टारियातील विगहॅम या छोटय़ा खेडय़ात झाला. त्यांचे वडील रॉबर्ट एरिक लेडलॉ यांचा पोल्ट्री व्यवसाय होता, तर त्यांची आई छोटय़ा शहरातील शाळेत शिक्षिका होती. वयाच्या ११व्या वर्षी मन्रो यांनी लेखक व्हायचे ठरविले आणि आपल्या या भूमिकेत त्यांनी कधीही बदल केला नाही. आपल्यामध्ये अन्य दुसरी क्षमताच नसल्याने कदाचित आपल्याला यामध्ये यश मिळेल असे वाटते, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. आपण खरेच बुद्धिमान नाही, आपण एक सर्वसाधारण गृहिणी आहोत, असेही त्या म्हणाल्या.
मन्रो यांची पहिली कथा ‘द डायमेन्शन्स ऑफ ए श्ॉडो’ १९५० मध्ये प्रकाशित झाली त्यावेळी त्या वेस्टर्न ओण्टारिओ विद्यापीठात शिकत होत्या. जेम्स मन्रो या पहिल्या पतीशी त्यांची भेट शाळेतच झाली. त्या १९५१ मध्ये विवाहबद्ध झाल्या आणि व्हॅन्कुव्हर येथे स्थायिक झाल्या. त्यांनी आपल्या तीन कन्यारत्नांना तेथेच वाढविले. त्यानंतर १९६३ मध्ये त्यांनी व्हिक्टोरिया येथे एक घर घेतले आणि पुस्तकाचे दुकानही थाटले. कॅनडातील सर्वात उत्तम असे हे पुस्तकाचे दुकान आहे, असे लेखक अ‍ॅलन फॉथरिंगम यांनी म्हटले आहे.
मन्रो यांच्या लघुकथा नियमितपणे ‘द न्यूयॉर्कर’ आणि ‘दि अटलाण्टिक मंथली’ या लोकप्रिय मासिकांमध्ये प्रसिद्ध होत होत्या. महिलांबाबत त्यांचे विशेष लिखाण असले, तरी त्यांनी लेखनातून पुरुषांचा कधीही उपमर्द केला नाही. लेखनासाठी त्यांनी निवडलेले विषय आणि त्यांची लेखनाची शैली यामुळे त्यांना ‘अवर चेकॉव्ह’ अशी उपाधी मिळाली. १९व्या शतकातील प्रसिद्ध नाटककार अ‍ॅण्टन चेकॉव्ह यांच्या नावाची ही उपाधी रशिया-अमेरिका वंशाच्या लघुकथा लेखिका सिंथिया ओझिक यांनी मन्रो यांना दिली.