स्त्री- पुरुषांमधील अत्यंत गुंतागुंतीच्या अशा नाजूक नात्यांचा आपल्या कथांमधून लक्षणीयरीत्या वेध घेणाऱ्या कॅनडातील ८२ वर्षीय लेखिका अ‍ॅलीस मन्रो यांच्या नावावर यंदाच्या नोबेल पुरस्काराची मोहोर उमटली आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त ठरणाऱ्या मन्रो या आतापर्यंतच्या १३ व्या महिला लेखिका ठरल्या आहेत. ‘सध्याच्या काळातील बिनीच्या समकालीन कथालेखिका’ या शब्दांत स्वीडिश अकादमीने मन्रो यांच्या साहित्य योगदानाचा गौरव केला आहे. ‘मनुष्याचे अत्यंत सुंदर चित्र रंगविण्यात मन्रो या कमालीच्या निष्णात आहेत. त्यांनी साहित्यक्षेत्रास दिलेले योगदान त्यांना नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी पुरेसे आहे’, असे स्वीडिश अकादमीचे कायमस्वरूपी सचिव पीटर इंग्लंड यांनी सांगितले. कॅनडातील काही समीक्षक त्यांचा उल्लेख ‘कॅनडाच्या चेकॉव्ह’ असा करतात.
नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर मन्रो या अत्यंत उत्साही आणि आनंदित दिसल्या, असे पेन्ग्विन रॅण्डम हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले. या पुरस्कारामुळे आपल्याला आनंद झाला आणि कॅनडाचे नागरिकही आनंदित होतील. यामुळे कॅनडातील लेखनाकडे आता अधिक लक्ष वेधले जाईल, असे मन्रो यांनी साभार नमूद केले. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या मन्रो या कॅनडाच्याही पहिल्या लेखिका ठरल्या आहेत.
स्टॉकहोम येथे येत्या १० डिसेंबर रोजी होणाऱ्या एका शानदार सोहळ्यात मन्रो यांना हा पुरस्कार देण्यात येईल. ८० लाख स्वीडिश क्रॉनोर (स्वीडनचे चलन) रोख या स्वरूपात हा पुरस्कार आहे.
लघुकथांच्या जनक असलेल्या अ‍ॅलीस मन्रो यांनी लघुकथांच्या क्षेत्रात एक प्रकारची क्रांतीच केली. लघुकथांचा चेहरामोहराही त्यांनी बदलून टाकला. एखाद्या अनपेक्षित ठिकाणी लघुकथेची सुरुवात करून भूतकाळ तसेच भविष्यकाळात त्या कथेला नेऊन सोडणे, हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय़. कथेची अत्यंत सुस्पष्टता, हेही त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. त्यामुळेच समीक्षक त्यांचा गौरव ‘कॅनडाच्या चेकॉव्ह’ या शब्दांत करतात. मन्रो यांच्या कथालेखनात त्यांच्या चाहत्यांना नेहमी कॅनडाच्या ग्रामीण पाश्र्वभूमीचे दर्शन घडले आहे. ज्या लघुकथालेखनामुळे आपल्याला लोकप्रियता मिळाली, त्या साहित्यप्रकाराकडे काहीशा अपघातानेच आपण वळलो. वर्षांनुवर्षे कथा लिहिताना, कथालेखन हा एक प्रकारचा सराव आहे, असे हा पुरस्कार घोषित होईपर्यंत आपल्याला वाटत होते, असे मन्रो यांनी म्हटले आहे.
कॅनडातील ओंटारिओ प्रांताच्या क्लिंटन या शहरात मन्रो यांचे वास्तव्य असते. ‘डिअर लाइफ’ या १४ व्या कथासंग्रहाच्या प्रकाशनानंतर निवृत्त होण्याचा आपला विचार असल्याचे मन्रो यांनी या वर्षी सांगितले होते.